महाराष्ट्र

maharashtra

कोयनेच्या चार टप्प्यांतून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती

By

Published : Oct 12, 2021, 7:11 PM IST

कोयनेच्या चार टप्प्यांतून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती
कोयनेच्या चार टप्प्यांतून 1500 मेगावॅट वीजनिर्मिती ()

राज्यातील विजेच्या तुटवड्यामुळे सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार चोवीस तास वीजनिर्मिती सुरू आहे. वीज निर्मितीच्या उपलब्ध पाणी कोट्याचे नियोजन करून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू आहे.

कराड (सातारा) - कोळसा टंचाईमुळे देशातील औष्णिक वीज प्रकल्प अडचणींचा सामना करत असताना कोयना प्रकल्पात दिवसाला सुमारे 1500 मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. तसेच पुढील आणखी काही दिवस अतिरिक्त वीज निर्मिती सुरू ठेवणार असल्याची माहिती कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी दिली.

500 मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती
कोयना प्रकल्पाच्या चार टप्यांतून 1 हजार 920 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी या मागणीच्या काळात कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात येते. राज्यातील विजेच्या तुटवड्यामुळे सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार चोवीस तास वीजनिर्मिती सुरू आहे. वीज निर्मितीच्या उपलब्ध पाणी कोट्याचे नियोजन करून अतिरिक्त वीज निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात खासगी आणि सरकारी कंपन्यांमधून वीज निर्मिती झाल्यानंतर ती कळवा (जि. ठाणे) येथील ग्रीडमध्ये आणली जाते. तेथून ती पूर्ण राज्याला मागणीनुसार वीज पुरवली जाते.

धरणात मुबलक पाणीसाठा
कोयना धरणाची पाणीपातळी 2159 फूट 3 इंच तर 99.74 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. सध्या धरण परिसरात तुरळ स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, धरणातील पाण्याची आवक पूर्णत: थांबलेली आहे. परतीच्या पावसाचा अंदाज असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातील विसर्ग पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे धरणात सध्या चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळेच अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजन करणे शक्य झाले आहे.

60 टक्के तूट भरून काढण्याचा प्रयत्न
राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कळवा येथील वीज नियंत्रण कक्षातून होणार्‍या सुचनेनूसार कोयना प्रकल्पातून अतिरिक्त वीज निर्मिती करून एकूण तुटवड्यापैकी 60 टक्के तूट भरून काढण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार वीज निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती महाजनकोचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी दिली.

हेही वाचा -मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देशात कोळशाचा तुटवडा - नवाब मलिक

ABOUT THE AUTHOR

...view details