महाराष्ट्र

maharashtra

Funeral of Jai Singh Bhagat In Sangli : खानापूरचे सुपुत्र शहीद जयसिंग भगत अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By

Published : Jan 21, 2023, 6:59 PM IST

Updated : Jan 21, 2023, 7:14 PM IST

सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र भारतीय लष्करातील शहीद नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबू शंकर भगत शनिवारी अनंतात विलीन झाले. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले. खानापूर येथे त्यांच्या पार्थिव शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय व राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती.

Funeral of Jai Singh Bhagat In Sangli
शहीद जयसिंग भगत यांच्यावर अंतिम संस्कार

सांगली :सियाचीन येथे भारताच्या सीमेवर कर्तव्य सेवा बजावताना झालेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे खानापूरचे जयसिंग भगत हे शहीद झाले आहेत. 40 वर्षीय जयसिंग भगत हे 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. गुरुवारी हिमवर्षाव होऊन, त्या ठिकाणी सेवा बजावणारे सुभेदार जयसिंग भगत हे शहीद झाले. या घटनेमुळे भगत कुटुंब आणि खानापूरमध्ये शोककळा पसरली. शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी खानापूर या त्यांच्या मूळ गावी प्रशासनाकडून शुक्रवारी सायंकाळपासून तयारी सुरु करण्यात आली होती.


कुटुंबीयांना शोक अनावर :शुक्रवारी पहाटे लडाखहून पुण्यात शहिद भगत यांचे पार्थिव विमानाने आणण्यात आले. त्यानंतर सकाळी लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांच्या पार्थिव पुण्यातून त्यांच्या खानापूर गावी पोहोचविण्यात आले. यावेळी शहीद जवान जयसिंग शंकरराव भगत यांचे पार्थिव त्यांच्या घरासमोर शेवटचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. पार्थिव दाखल होताच भगत कुटुंबाने हंबरडा फोडला, तर उपस्थितांचे डोळे ही यावेळी पाणावले होते.

अंत्यसंस्काराला जनसागर लोटला :त्यानंतर शहीद सुभेदार जयसिंग भगत यांच्या पार्थिवाची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. याप्रसंगी आटपाडी शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला होता. तसेच शालेय विद्यार्थी, तरुण, आबालवृद्ध हे देखील या अंतयात्रेमध्ये सहभागी झाले होते. यानंतर शासकीय इतमामात शहीद सुभेदार जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले. यावेळी बंदुकांच्या फैरी झाडून सलामीही देण्यात आली. या अंत्यसंस्कारासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपाचे खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह राजकीय नेते मंडळींनी उपस्थिती लावत श्रद्धांजली वाहिली. तसेच शासकीय अधिकारी देखील अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले होते आणि हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जयसिंग भगत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :Poisoning To Students From Chicken : सहलीत चिकन खाल्ले; जिल्हा परिषद शाळेतील अकरा मुलांना विषबाधा

Last Updated :Jan 21, 2023, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details