महाराष्ट्र

maharashtra

कोरोना इफेक्ट : पेणच्‍या गणेशमूर्ती व्‍यवसायाला मोठा फटका

By

Published : Aug 12, 2020, 11:58 AM IST

पेण शहरातील गणेशमूर्ती कलेला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला आहे. काही मूर्तीकारांनी नेहमीप्रमाणे आपल्‍याकडील मूर्ती परदेशी पाठवल्‍या. परंतु, दरवर्षीच्‍या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

Ganesh Idol
गणेशमूर्ती

रायगड - यावर्षी सर्व व्यवसायांना कोरोनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला आहे. यंदा लॉकडाऊनचे विघ्‍न पार करत बाप्‍पा विदेशातही पोहोचले खरे. मात्र, मूर्तीकारांसमोर मूर्ती विक्रीचे विघ्‍न कायम आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्यवसायालाही बसला

पेण शहरातील गणेशमूर्ती कलेला दीडशे वर्षांचा इतिहास आहे. वामनराव देवधर यांनी गणेशमूर्ती बनवण्‍याचा व्‍यवसाय पेण शहरात प्रथम सुरू केला होता. आता पेण आणि आजूबाजूच्‍या अनेक गावांमध्‍ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय पसरला आहे. सध्या पेण तालुक्‍यात साडेचारशेहून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास 40 लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यंदा मात्र या व्‍यवसायावर कोरोनाचे सावट आहे. काही मूर्तीकारांनी नेहमीप्रमाणे आपल्‍याकडील मूर्ती परदेशी पाठवल्‍या परंतु दरवर्षीच्‍या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.

गणेशमूर्ती व्‍यवसायातून पेणमध्‍ये दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे मुंबईतील व्‍यापारी, विक्रेते अजून फारसे मूर्ती खरेदीसाठी पेणकडे फिरकले नाहीत. लॉकडाऊनमुळे दोन महिने गणेशमूर्ती विकल्या गेल्‍या नाहीत. आता काही प्रमाणात विक्री सुरू झाली मात्र, मुंबई, ठाणे, कल्याण भागात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला. त्‍यामुळे तिकडचे ग्राहक येणे थांबले आहे. मुंबईत फुटपाथवर स्‍टॉल लावण्‍यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्‍यामुळे अजून 30 ते 40 टक्‍के मूर्ती कार्यशाळांमध्येच आहेत. अपेक्षित संख्‍येत मूर्ती अजूनही विक्रीसाठी बाजारात गेल्‍या नाहीत. मूर्तीकारांनीदेखील यंदा कमी म्‍हणजे 50 टक्‍केच उत्पादन केले आहे. स्थानिक कारागीरांनाही त्‍यामुळे रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे.

दरवर्षी थायलंड, मॉरीशस, फिजी, अमेरिका या ठिकाणी माझ्याकडील 5 हजार गणेशमूर्ती जातात. यंदा कोरोनामुळे केवळ 25 टक्‍के म्‍हणजे 1 हजार 200 मूर्ती गेल्‍या. मॉरीशस आणि थायलंडलाच यंदा मूर्ती गेल्या असून बाकीच्‍या ठिकाणी व्‍यापाऱ्यांनी माल नेला नाही. यंदा परदेशातील महाराष्‍ट्रीयन लोकही भारतात आले आहेत, असे पेण येथील मूर्तीकार दीपक समेळ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details