महाराष्ट्र

maharashtra

Darshana Pawar Murder : दर्शना पवार खून प्रकरण; प्रेमाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाची केली हत्या

By

Published : Jun 22, 2023, 3:20 PM IST

Updated : Jun 22, 2023, 4:22 PM IST

राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी राहुल हंडोरे या तरुणाला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. दर्शनाने प्रेमाला नकार दिल्यामुळे हा खून केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

Pune Murder Case
संपादित छायाचित्र

पुणे : किल्ले राजगडाच्या पायथ्याशी तीन दिवसांपूर्वी एमपीएससी परिक्षेत तिसरी आलेल्या दर्शना पवारचा संशयास्पद मृतदेह हा सापडला होता. दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहूल हंडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. प्रेम प्रकरणाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाला किल्ले राजगडच्या पायथ्याशी नेत तिथे दर्शनाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे याला अटक केली आहे.

दर्शना पवार खून प्रकरणात माहिती देताना पोलीस अधिक्षक अंकित गोयल

सतीचा माळ परिसरात आढळला मृतदेह :व्हिलेज पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावाच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी 18 जून रोजी बेवारस मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळे रंगाचा गॉगल तसेच काळ्या रंगाची बॅग, निळ्या रंगाचे जर्किन अशा वस्तू मिळून आल्या होत्या. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह दर्शना दत्तू पवार ( वय २६ वर्षे रा राज शाहू बँक नन्हे पुणे ) हिचा असल्याचे उघड झाले होते. दर्शना 12 जून रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून गेली होती. पण ती परत आली नव्हती, त्यामुळे तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे 15 जून रोजी रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. मृतदेहाचे शव विच्छेदन केल्यावर तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते.

तिने स्पर्धा परिक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण :दर्शना दत्तू पवार मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. तिने स्पर्धा परिक्षेत फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) म्हणून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. दर्शना ही काही दिवसांपूर्वी अकादमी तर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. दर्शना आणि आरोपी राहुल यांची लहानपणापासूनची ओळख असून राहुल दर्शनावर प्रेम करत होता. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. मात्र प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वनाधाकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूल नैराश्यात होता.

सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी नेले अन् घात केला :दर्शना जेव्हा पुण्यात अकादमी तर्फे सत्कार समारंभाला आली, तेव्हा 12 जून रोजी राहुलने दर्शनाला सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जाऊ असे सांगून तिला घेऊन गेला. सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास ते ट्रेकिंगला गेले पण सायंकाळनंतर त्यांचे मोबाईल बंद येऊ लागले. त्यांच्या कुटूंबाने शोध घेतला, पण ते दोघेही सापडले नाहीत. तेव्हा दर्शनाच्या कुटूंबियांनी पुण्यातील सिंहगड रोड आणि तिच्याबरोबर असलेल्या तिचा मित्र राहुलच्या कुटूंबियांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे मिसींगची तक्रार दाखल केली होती. पण, दुर्दैवाने रविवारी तिचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून आता याप्रकरणाचा कसून शोध सुरू केला. पोलिसांकडून राहुलचा शोध सुरू केला, पण तो देखील गायब होता. अखेर त्याला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल पश्चिम बंगालमध्ये :दर्शनाच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून पाच पथक तयार करण्यात आली होती. संशयित आरोपी राहुल याचा शोध घेण्यात येत होता. राहुलने दर्शनाची हत्या केल्यानंतर तो राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. तो पश्चिम बंगालमध्ये देखील गेल्याची माहिती मिळत होती. अखेर त्याला काल रात्री अंधेरी रेल्वे स्टेशन येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. प्रेमाला नकार दिला म्हणून दर्शनाची राहुलने हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा -

  1. Darshana Pawar murder case: दर्शना पवार एमपीएससीतून अधिकारी झाली अन् मित्रानेच घात केला? आरोपीला मुंबईतून अटक
  2. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरूणीचा सडलेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय
Last Updated : Jun 22, 2023, 4:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details