पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत 65 मराठा उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे याबाबत संयुक्त जाहिरात 2020 मधील सहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदांचा निकाल घोषित करण्यात आला. या सर्व उमेदवारांना नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या मराठा उमेदवारांना मात्र डावलण्यात आले आहे. या जाहिरातीतील पदांचा निकाल गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रलंबित होता. आता त्यातल्या केवळ मराठा समाजातीतील 65 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
मराठा उमेदवारांचा निकाल राखीव : या जाहिरातीचा इतर कोणत्याही न्यायालयीन प्रकरणांशी प्रत्यक्ष संबंध नाही. इतर न्यायालयीन प्रकरणांशी संबंध जोडून शासनाने या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला आहे. मराठा समाजातील 65 उमेदवारांना डावलण्यात येऊन उर्वरित 585 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याचीही तयारी शासन करत आहे. त्यामुळे गुणवत्ता सिद्ध करूनही हे उमेदवार क्लेशदायक परिस्थितीत अडकले आहेत. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत शासनाने याकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी केली आहे.