महाराष्ट्र

maharashtra

जीओ टॅगींग केल्यास शेतकऱ्यांना अधिक मूल्यवृध्दी - राज्यपाल

By

Published : Aug 7, 2021, 11:08 AM IST

Updated : Aug 7, 2021, 12:40 PM IST

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय वापर अधिक महत्वाचा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा अधिक लाभ मिळेल, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

governor's tour in marathwada
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली आढावा बैठक

परभणी -तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सायंकाळी परभणीत महसूलसह जवळपास सर्वच विभागांचा आढावा बैठक घेतली. यावेळी ते असे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे वैशिष्ट असलेले विशेष वेगळे पीक, फळे, भाजीपाल्याचे वाण आहेत. अशा वाणांची आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांसह जीओ टॅगींग केली तर त्यात शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनात अधिक मूल्यवृध्दी साध्य करता येईल. यासाठी कृषी विद्यापीठ व संबंधित विभागाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.

राज्यपालांचे स्वागत करतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल

सर्वच विभागांची घेतली आढावा बैठक -

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना, अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे आदीसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

'पाण्याचे प्रभावी नियोजन महत्वाचे' -

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय वापर अधिक महत्वाचा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पुर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा अधिक लाभ मिळेल. या दृष्टीने संबंधित विभागप्रमुखांनी कटिबध्द होवून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

अन्य विभागाच्या विकास कामांचा घेतला आढावा -

या बैठकीत जिल्ह्यातील कोविडअंतर्गत केले जाणारे व्यवस्थापन, यासाठी उच्च तंत्रज्ञानाची घेतलेली मदत (आयसीटी), सामाजिक न्याय विभागाच्या योजना, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हीटी, ई-पिक पाहणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बांबू लागवड, कोविड काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राबविलेले उपक्रम, परभणी जिल्ह्याची भौगोलिक वैशिष्टे याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सादरीकरणाद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापुढे विकास कामांचा आढावा ठेवला.

राष्ट्रवादीच्या अधिकाऱ्यांनी दिला होता इशारा -

राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यावरून मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आढावा बैठक घेतली होती.

हेही वाचा -आता सोशल मीडियावर "लाव रे तो व्हिडिओ" होईल सुरू, विजय वडेट्टीवार यांची टोलेबाजी

शुक्रवारी मुक्काम, आज विद्यापीठात करणार पाहणी -

परभणी-हिंगोली-नांदेड या तीन जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल कोश्यारी हे शुक्रवारी परभणीत मुक्कामी होते, त्यांनी संध्याकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या विश्रामगृहात मुक्काम केला. आज शनिवारी सकाळी ते विद्यापीठातील बांबू प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उष्मायन केंद्राला भेट देऊन तरुण उद्योजकांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर त्यांच्यापुढे विद्यापीठाचा अहवाल सादर होणार असून स्वच्छ भारत अभियानाच्या व्हिडिओ फिल्मचे प्रदर्शन होईल. ते प्राध्यापकांशी संवाद साधतील. दुपारी 1.30 वाजता येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे जाणार आहेत.

हेही वाचा - माझ्या अखत्यारीतील काम करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलाय- राज्यपाल कोश्यारी

Last Updated : Aug 7, 2021, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details