महाराष्ट्र

maharashtra

परभणीत सततच्या पावसाने सोयाबीन, कापसाला फुटले कोंब; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

By

Published : Oct 1, 2020, 3:58 PM IST

जिल्ह्यात यंदा सप्टेंबरअखेर 830 मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या 111 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जायकवाडी आणि येलदरी धरणातून गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येथील नद्यांना पूर येऊन हजारो हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे.

परभणीत सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
परभणीत सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

परभणी - जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला आता कोंब फुटू लागले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनाम्याची प्रक्रिया संपवून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तर, परभणी परिसरातील शेतकऱ्यांच्या हातून यंदाच्या खरिपाचे पीक जाण्याच्या मार्गावर असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात यंदा सप्टेंबरअखेर 830 मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या 111 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जायकवाडी धरणातून गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. शिवाय येलदरी धरणातून देखील पूर्णा आणि दूध नदीच्या पात्रात पाण्याची आवक होत असल्याने या नद्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी शेतांमध्ये घुसले असून शेतांमधील पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हजारो हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे.

हेही वाचा -भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग

दरम्यान, प्रशासनाने तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही प्रक्रिया रेंगाळलेली दिसून येते. मात्र, महसूल प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पाहणीत जिल्ह्यातील 38 हजार हेक्टर शेत जमिनीवरील पिकांची नासाडी झाली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याप्रमाणे फळबागांचे नुकसान झाल्याचे दिसून येते.

सततच्या पावसामुळे परभणी तालुक्यातील किन्होळा येथे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला कोंब फुटत आहेत. शेतात पाणी साचून पिकांची नासाडी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यामुळे आता शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासाठी परभणी तालुक्यातील किन्होळा या गावातील शेतकऱ्यांनी लवकर पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा -कोरोना काळात अतिक्रमणांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत तातडीने कारवाई करू नये-मुंबई उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details