महाराष्ट्र

maharashtra

जगण्यानेच नाही तर मरणानेही छळले; कोरोनाग्रस्त मृतदेहाला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून पालिका कर्मचारी पसार

By

Published : Aug 25, 2021, 8:04 PM IST

Updated : Aug 25, 2021, 8:20 PM IST

osmanabad

उस्मानाबाद शहरालगत असलेल्या कपिलधारा स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी उस्मानाबाद नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उस्मानाबाद -"इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते." सुरेश भटांची अशी एक प्रसिद्ध कविता आहे. मात्र, उस्मानाबाद शहरात या उलट घडले आहे. जगण्यासह मरणाने देखील छळल्याचा प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद शहरालगत असलेल्या कपिलधारा स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी उस्मानाबाद नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाग्रस्त मृतदेहाला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दोन तास मृतदेह त्याच अवस्थेत स्मशानात पडून होता.

माहिती देताना रामा गंदेलवाड मसनजोगी

हेही वाचा -मी तुम्हाला पुरून उरलो, आता चांगल्या शब्दांत टीका करणार - नारायण राणे

  • ओली लाकडे पुरवल्यामुळेच प्रकार घडल्याचा दावा-

उस्मानाबाद नगरपालिकेच्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना झाल्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तब्बल दोन तास मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्मशानभूमीमध्ये तसाच पडून होता. कंत्राटदाराने ओली लाकडे पुरवल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे मसनजोगी रामा गंदेलवाड यांनी सांगितले.

  • दोन तास मृतदेह स्मशानभूमीच्या लोखंडी सांगाड्यात पडून

कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी उस्मानाबाद नगरपालिकेकडे आहे. मंगळवारी कोरोनाग्रस्तांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कपिलधारा स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला अग्नी दिला आणि लगेच तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळात चिता विझली. त्यामुळे तब्बल दोन तास हे मृतदेह स्मशानभूमीच्या लोखंडी सांगाड्यात तसेच पासून होते. शहरातील काही नागरिक तिथे गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला.

  • डिझेल टाकून अर्धवट जळालेला मृतदेह पूर्णपणे केला दहन -

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा त्यांनी व्हिडिओ काढला. तसेच इतर लोकांनी डिझेल टाकून अर्धवट जळालेला मृतदेह पूर्णपणे दहन केला. तोपर्यंत सुमारे दोन तास मृतदेह तसाच अर्धवट जळालेल्या स्थितीत होता, अशी माहिती समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ समोर आल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.

कोरोनाग्रस्त मृतदेह नातेवाईकांना न देता इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून अंत्यविधीसाठी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतो. त्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, कर्मचाऱ्यांकडूनच अशा पद्धतीचे बेजबाबदार कार्य होत असल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

हेही वाचा -Narayan Rane Case : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

Last Updated :Aug 25, 2021, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details