माझ्या घरावर हल्ला, तुम्हालाही घरदार आहे, कुटुंबीय आहे... लक्षात ठेवा -नारायण राणे

author img

By

Published : Aug 25, 2021, 4:31 PM IST

Updated : Aug 26, 2021, 12:45 PM IST

LIVE UPDATE : नारायण राणे उद्धव ठाकरेंविषयी काय बोलणार? पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा...

ज्यांना देशाचा स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती नाही, त्यांनी चेष्टा करावी हे सहन न झाल्यानेच माझ्या तोंडून ते वाक्य आले असे म्हणत नारायण राणेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. यावेळी बोलताना पुढचं वाक्य नेक्स्ट टाईम असे म्हणत मी माझी बाजू मांडली असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांसमोर दिले.

मुंबई : ज्यांना देशाचा स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती नाही, त्यांनी चेष्टा करावी हे सहन न झाल्यानेच माझ्या तोंडून ते वाक्य आले असे म्हणत नारायण राणेंनी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. यावेळी बोलताना पुढचं वाक्य नेक्स्ट टाईम असे म्हणत मी माझी बाजू मांडली असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांसमोर दिले. मी जेवढं सांगितलं त्यापैकी तुम्हाला लोकांपर्यंत जेवढं पोहोचवता येईल तेवढं पोहोचवा, मी केलं ते राष्ट्रीयत्व असेही ते पत्रकारांना म्हणाले.

तुम्ही माझं काहीही करू शकत नाही

यावेळी शिवसेनेवर शरसंधान साधताना तुम्ही कुणीही माझं काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझाही वाटा आहे. तेव्हा यापैकी कुणी नव्हते. ज्यांनी अपशब्द वापरले तेही तेव्हा नव्हते असेही राणे म्हणाले. तुम्ही सर्वांनी अनिल परब यांची कॅसेट पाहिली असेल. अधिकाऱ्यांना आदेश देता, पकडा त्याला. अरे काय डकैती केलीय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य कुठे आहे असे राणे म्हणाले.

असं काय बोललो? 52 वर्षांत अशी पत्रकारिता पाहिली नाही

मी असं काय बोललो होतो, ज्याचा राग आला. ते वाक्य मी आता परत बोलणार नाही. कारण कोर्टात केस चालू आहे असे नारायण राणे म्हणाले. एखादी गोष्ट घडली तर त्याचा कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे. 52 वर्षांत अशी पत्रकारिता पाहिली नाही असा टोलाही राणे यांनी माध्यमांना लगावला.

पवार साहेब हा सुसंस्कृतपणा आहे का?

शिवसैनिकांनी यापूर्वी असे शब्द वापरले नाही का? असा सवाल उपस्थित करत सेना भवनबद्दल जो काही असे बोलेल त्याचे थोबाड फोडा असे मुख्यमंत्री बीडीडी चाळीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलल्याचा दाखला राणेंनी दिला. हा क्राईम नाही का. योगी आदित्यनाथांविषयी बोलताना, 'हा योगी आहे की ढोंगी, याला चपलाने मारले पाहिजे' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले होते. हा सुसंस्कृतपणा आहे का? निर्लज्जपणे आत ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर येऊन सांगता असे असंसदीय शब्द मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांविषयी वापरले. तो शब्द मी वापरणार नाही. पण काय हो पवार साहेब. हा काय सुसंस्कृतपणा आहे असा खोचक सवालही राणे यांनी यावेळी विचारला.

हे जरा पवारांना सांगा

मुख्यमंत्र्यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटल्याविषयी बोलताना हे जरा शरद पवारांना सांगा असे राणे म्हणाले. कुणाची पाठ थोपटताय, मार खाऊन आले होते ते असेही ते म्हणाले.

कोथळा दाखवावा लागेल

राणेंचा कोथळा बाहेर काढीन असा इशारा शिवसेना आमदाराने दिल्याचे सांगितल्यावर आयुष्यात कधी उंदीर नाही मारला, कसले कोथळे? त्याला दाखवावे लागेल कोथळे कसे असतात असे राणे म्हणाले.

ज्योतिषाला विचारून सांगेन

हे सरकार काही दिवसांचा पाहुणा असल्याचे राणे म्हणाल्यानंतर सरकार पडणार का असे पत्रकारांनी विचारले असता मी आधी ज्योतिषाकडे जाणार आहे. त्यानंतर सरकार कधी पडणार याची तारीख देणार असे राणे म्हणाले. यानंतर पत्रकार परिषद बंद असेही ते पुढे म्हणाले. तसेच कोर्टाने मला मुँहतोड शब्द वापरायला सांगितले नाही. त्यामुळे तुम्ही आता मला प्रश्नच विचारू नका असेही राणे म्हणाले.

आता चांगल्या शब्दांत टीका करणार

टीका चांगल्या शब्दांत करावी एवढं मला माहिती आहे. यात्रेदरम्यान पुढील टप्प्यात टीका चांगल्या शब्दांत राहिल असे राणे म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी का यावर मी काही भाष्य करणार नाही असे ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यावेळी नितेश राणेंच्या पोस्टवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, करारा जवाब किस तरह का होता है, उनको ज्यादा जानकारी है असे राणे म्हणाले.

पश्चिम बंगालसारखे वातावरण होऊ देणार नाही

भाजप महाराष्ट्रात पश्चिम बंगालसारखे वातावरण बनू देणार नाही. जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून काही लोकांना तो रुचला नाही, म्हणून हे सुरू आहे. महाडला जाईपर्यंत कुणीही मला अटक केली नाही. त्यांच्या विनंतीवरून मी कोर्टात हजर झालो असेही त्यांनी सांगितले.

सामनावर 17 तारखेनंतर उत्तर देणार

सामनाच्या अग्रलेखावर बोलताना 17 तारखेनंतर मी त्यांना उत्तर देईल असे राणे म्हणाले. शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले होते. मी गँगस्टर होतो तर मुख्यमंत्री चालत होतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दोन्ही निकाल माझ्या बाजुने

पत्रकार परिषद सुरू करतानाच माझ्याविरोधातील कोर्टातील दोन्ही केसेसचा निकाल माझ्या बाजुने लागले आहेत अशी माहिती राणेंनी दिली. याचा अर्थ देश कायद्याने चालत आहे हे सिद्ध झाले आहे असे राणे यावेळी म्हणाले. गेले काही दिवस माझा दौरा म्हणा, जनआशीर्वाद यात्रा चालु असताना जे काही वृत्तपत्रे, टीव्हीवर येत होते. त्याची माहिती माझ्याकडे येत होती. माझ्या चांगुलपणाचा काही जण फायदा घेत होते. पण त्यावर बोलणार नाही असे राणे यावेळी सूचकपणे म्हणाले. पत्रकार परिषदेत नंतर बोलताना पत्रकारांनी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला असेही ते म्हणाले.

परवापासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रेत

केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांत राबविलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले. अनेक खासदारांना नव्याने संधी देण्यात आली. त्या सर्वांना पंतप्रधानांनी आपल्या राज्यात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली असे राणे म्हणाले. मी कालपर्यंत यात्रेत होतो. आता दोन दिवसांचा व्यत्यय आलाय. परवा सिंधुदुर्गपासून पुन्हा यात्रेत मी सहभागी होणार आहे असेही ते म्हणाले.

कोरोना मृत्यूंवरून राज्य सरकारवर टीका

कोरोनामुळे देशात जेवढे मृत्यू झाले त्याच्या एक तृतीयांश मृत्यू महाराष्ट्रात झाले. राज्यात परिस्थिती भयावह आहे, मात्र काही लोकांनी त्यांना वाचविण्याची सुपारीच घेतली आहे. आम्ही चॅनेल पाहतो असे पत्रकारांना उद्देशून सूचकपणे नारायण राणे म्हणाले. यावेळी बोलताना पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी कोर्टाचा निकाल आला आहे असेही राणे यांनी सांगितले. राज्य सरकार तोपर्यंत कोणतेही निर्बंध लादणार नाही किंवा कारवाई करणार नाही. सर्व कारवाईपासून कायदेशीर संरक्षण हे कोर्टाने सांगितले आहे अशी माहिती राणे यांनी दिली.

तुम्हालाही घरदार आहे, कुटुंब आहे

मुंबईत माझ्या घरावर शिवसेनेने दगडफेक केली. चक्क माझ्या कुटुंबावर हल्ला. तुम्हालाही घरदार आहे. कुटुंब आहे. याचे भान ठाकरे कुटुंबियांनी ठेवायला हवे, असे नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा - करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंचा इशारा!

Last Updated :Aug 26, 2021, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.