महाराष्ट्र

maharashtra

Water Issue Nashik : महिलांची पाण्यासाठी वणवण; खळग्यातील गढूळ पाण्यासाठी दोन किलोमीटर करावी लागतेय पायपीट

By

Published : Mar 17, 2023, 9:49 PM IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागातील चौडापाडा आणि मुलवड गावात भीषण पाण्याची टंचाई आहे. यामुळे गावातील महिलांना खळग्यातील गढूळ दूषित पाण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Water Issue Nashik
पाणी टंचाई

त्र्यंबकेश्वर भागातील चौडापाडा आणि मुलवड गावात भीषण पाण्याची टंचाईचे वास्तव

नाशिक : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्यावतीने पाणी पुरवठा विभागाद्वारे हर घर जल मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात असताना नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर भागातील चौडापाडा आणि मुलवड गावात भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आले आहे. या गावातील महिलांना चक्क पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच दोन किलोमीटर पायपीट करूनही या महिलांना गढूळ पाणी मिळत आहे.


ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई : अध्यात्मिक, धार्मिक यासोबत धरणाचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठी धरणे मिळून एकूण 24 धरण आहेत. मात्र, असे असले तरी नाशिकच्या ग्रामीण भागातील भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील चौडापाडा आणि मुलवड गावातील महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पाण्याच्या शोधासाठी डोंगराळ भागातून पायपीट करावी लागत आहे. आणि एवढे करून खळग्यातील दूषित गढूळ पाणी गाळणीने गळून पिण्यासाठी वापरावे लागते आहे.

पाण्यासाठी महिलांची पायपीट : नाशिकमधील या भागातील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने 15 लाख रुपये खर्च करून विहीर बांधली. मात्र, या विहिरीला देखील गढूळ पाणी येत असल्याने हे पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट आदिवासी महिलांना करावी लागत आहे. मार्च महिन्यातच पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, पुढील एप्रिल आणि मे महिना हा अधिक त्रासदायक असेल, असे येथील महिलांनी सांगितले आहे.

नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी : ग्रामीण भागात नागरिकांना सुरक्षित आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नळ पाणी पुरवठा विहिरी, साधी विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे तसेच विंधन विहिरीव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अशा योजना राबविल्या जात आहे. या योजना आमच्या गावात राबवाव्यात, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

महिलांची पाण्यासाठी वणवण : गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या गावात पाण्याची कठीण परिस्थिती आहे. आम्हाला पाण्यासाठी रोज चार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तेव्हा कुठे पाणी मिळते आणि तेही दूषित पाणी असते. त्यामुळे ते गाळून घ्यावे लागते आणि घरी जाऊन उकळावे लागते. पाणी जनावरांनी पिऊ नये म्हणून आम्ही झऱ्याला कुंपण लावून ठेवले आहे. रोज काम सोडून आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते. तेव्हा कुठे 10 लिटर पाणी मिळते. त्यातल्या त्यात लहान मुले देखील पाणी आणण्यासाठी घेऊन जावे लागते. त्यामुळे त्यांचे शाळा बुडते हा एक मुद्दा आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने आमची पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिक पंढरीनाथ बांगर यांनी केली आहे.

पाणीटंचाईचा करावा लागतोय सामना :त्र्यंबकेश्वरमध्ये आहिल्या डॅम, आंबोली डॅम आणि गौतमी गोदावरी या तीन धरणातून पाणीपुरवठा होत असताना देखील दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. आणि तो देखील दिवसात 45 मिनिटे होत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगपैकी असल्यामुळे येथे देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. तसेच या ठिकाणी अनेक हॉटेल, लॉजिंग असल्याने पाणी देखील अधिक प्रमाणात लागते. मात्र त्या प्रमाणात येथील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून त्र्यंबकेश्वरमधील नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे.

हेही वाचा :Farmers Long March : ‘लाल वादळा’च्या सर्व मागण्याची अंमलबजावणी करा; अन्यथा सोमवारी लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने, आयोजकांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details