महाराष्ट्र

maharashtra

आजची सभा ऐतिहासिक आणि दिशादर्शक होईल, विजय वडेट्टीवारांचा विश्वास; सभेसाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नागपूरमध्ये दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 1:18 PM IST

Updated : Dec 28, 2023, 2:09 PM IST

Congress Foundation Day : काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात 'है तयार हम' या सभेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते दाखल झाले आहेत.

Congress Foundation Day
Congress Foundation Day

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नागपुरात दाखल

नागपूर Congress Foundation Day : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं देशाच्या हृदयस्थानी होत असलेली ही सभा ऐतिहासिक आणि देशाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. ते आज सभेपूर्वी नागपुरात बोलत होते. काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेसाठी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते नागपुरात दाखल झाले आहेत.

काय म्हणाले वडेट्टीवार : आजच्या सभेला देशभरातील काँग्रेस पक्षाला मानणारे लाखो लोक आवर्जून येतील. इतकंच नाही तर काँग्रेसचे नेते नागपूरच्या ऐतिहासिक सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून आम्ही सभा यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र काम केलंय. यंदाचा स्थापना दिवस हा सगळ्यांच्या लक्षात राहील अशी अलोट गर्दी यावेळी सभेत दिसेल अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय.

लोकसभा जागा वाटपाची उद्या दिल्लीत चर्चा : काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ आजच्या सभेत फोडणार आहे. जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी उद्या दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विदर्भात कॉंग्रेसचा स्थापना दिवस होत असून आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल. विदर्भातील दहापैकी सात जागा आम्ही जिंकू असा आमचा सर्व्हे सांगतो. राहुल गांधी प्रचंड मेहनत करत आहेत. पुन्हा न्याय यात्रा सुरू होणार असून या यात्रेत अनेक गावांतून पायी प्रवास तसंच सभाही होणार आहेत.

आमच्याकडं पंतप्रधानपदाचे खूप चेहरे : ही सभा आमच्यासाठी खूप मोठी आहे. आम्ही 138 वर्ष पूर्ण केली आहेत. आज याठिकाणी आम्हाला आमचे नेते मार्गदर्शन करतील, आशीर्वाद देतील. इंडिया आघाडी एकत्र आहे. आपल्या इतिहासात नागपूरचं खूप महत्त्व आहे, म्हणून आम्ही इथं आलो आहेत. पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे खूप चेहरे आहेत. आता आम्ही एक संकल्प घेऊन पुढं जात आहोत. येणाऱ्या काळात परिस्थिती नक्कीच बदलेल. आजची सभा झाल्यावर जागावाटपासंदर्भात चर्चा होईल, असं काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय.

काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम : या सभेला सर्व केंद्रीय नेतृत्व येणार आहे. काँग्रेस पक्षाला विदर्भातून नेहमीच ताकद आणि ऊर्जा मिळालेली आहे. देशाला सुद्धा नवीन संदेश नागपूरच्या माध्यमातून जाईल. उद्याची बैठक पक्षांतर्गत जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्यांच्यासोबत किती जागा लढवाव्यात यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. काँग्रेस नेतृत्वाला उगाच बदनाम करण्याचं काम केलं जातंय. काँग्रेस नेते गेल्या अनेक वर्षांपासून गांभीर्यानं काम करत आहेत. राहुल गांधींनी पदयात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याचा काम केलंय. आता पूर्व ते पश्चिम अशी नवीन पदयात्रा सुरू करणार आहेत, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा :

  1. 'है तयार हम', नागपुरातून लोकसभेसाठी काँग्रेस फुंकणार रणशिंग; मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी राहणार उपस्थित
  2. देशातील सर्वात जुन्या पक्षाचा 139वा स्थापना दिवस; काय आहे कॉंग्रेसचा इतिहास, वाचा सविस्तर
Last Updated :Dec 28, 2023, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details