महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Crime : फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई, युनिट 3 ने 11 आरोपींना केली अटक

By

Published : Jan 21, 2023, 7:09 AM IST

crime

चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर चालवण्यात येणार्‍या कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने कारवाई केली आहे. याप्रकरणी अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परदेशी कंपनी असल्याचे भासवूण ते पैशांची मागणी करायचे

मुंबई :वडाळा पूर्व येथील अँटॉप हिल येथील वेअर हाऊस जवळ असलेल्या ट्रेड ग्लोबल मार्केट या कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या कक्ष 3 ने कारवाई केली आहे. याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420, 34 सह माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क) (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कॉलर ट्रेड ग्लोबल मार्केट बनावट कंपनी :19 जानेवारीला सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गुजावर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, "ट्रेड ग्लोबल मार्केट", गाळा नं. ३३१, बी विंग, अन्टॉप हिल वेअर हाऊस, तिसरा मजला, वडाळा (पुर्व) या ठिकाणी अमेरीकन नागरिकांना इंटरनेटद्वारे कॉल केला जायचा. कॉलर ट्रेड ग्लोबल मार्केट ही यु.के. बेस बनावट कंपनी असल्याचे सांगून या कॉलसेंटरमधून यु.के, दिल्ली आणि मुंबई येथून बोलत असल्याचे भासवायचा. यात तो परदेशातील तसेच भारतातील नागरिकांना Zoipar software वरून कॉल करून प्रत्येक कस्टमरला कमीत कमी ५०० ते १००० डॉलर इतकी रक्कम क्रेडीट करायला सांगायचा. रक्कम क्रेडीट झाली की मग परत न देता फसवणूक करतात.


बोगस कॉल सेंटरमध्ये छापा : या मिळालेल्या माहितीवरून गुन्हे कक्ष-३चे अधिकारी आणि अंमलदारांनी वडाळा येथील बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकला. बोगस कॉल सेंटरच्या ठिकाणी काही इसम त्यांच्याकडे कोणतेही परवाने न घेता, भारतामध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवित असल्याचे निदर्शनास आले. ताब्यात घेतलेल्या इसमांकडे कॉलसेंटर बाबत अधिक तपास केला असता, त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रथमदर्शनी २ ते ३ हजार ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना या कंपनीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची कोटयावधी रूपयाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना घटनास्थळी १५ लॅपटॉप, ०१ डेस्कटॉप, २ राउटर, ०१ लॅन मशिन व इतर साहित्य आढळले.ते सर्व ताब्यात घेतले.


पोलीसांची यशस्वी कारवाई : ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) प्रशांत कदम, सह. पोलीस आयुक्त, मध्य प्रकटीकरण, नामदेव शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शामराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली भारते, समीर सुजावर, पोलीस उपनिरीक्षक आरीफ पटेल, पोलीस शिपाई तांबडे आदी पोलिसांनी केली. 11 आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे किल्ला कोर्ट, मुंबई यांच्या समक्ष रिमांड करीता हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने अटक सर्व आरोपींना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :6 Naxalites Arrested सुकमा विजापूर जिल्ह्यात 6 नक्षलवाद्यांच्या सुरक्षा दलांनी आवळल्या मुसक्या, स्फोटक सामान जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details