महाराष्ट्र

maharashtra

कोरोना रोखण्यासाठी मुंबईकरांची साथ हवी; महापौरांनी व्यक्त केली अपेक्षा

By

Published : Mar 20, 2021, 10:25 AM IST

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. मात्र, नागरिक नियमांचे पालनच करत नसल्याचे चित्र आहे.

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर

मुंबई - राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी साथ दिली तर कोरोनाचा प्रसार पुन्हा रोखता येऊ शकतो, असा आशावाद महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. मॉलमध्ये जाणा-यांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. मात्र, अशा टेस्ट किती वेळा करणार याबाबत संभ्रमावस्था आहे. यासाठी धोरण निश्चित करावे लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी माध्यमांशी चर्चा केली

मॉलमधील चाचण्यांबाबत संभ्रम -

मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी माध्यमांशी चर्चा केली. मास्क ही शिक्षा नाही तर सुरक्षा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मास्क वापरा आणि गर्दी करू नका, असे आवाहन करत, पालिकेकडून घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची महापौरांनी माहिती दिली. लोकांची सुरक्षा ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, लोकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मॉल, पब, आदी गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे चाचण्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मॉलमध्ये जाणा-यांची चाचणी कितीवेळा करायची तसेच बंधनकारक करायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही पेडणेकर म्हणाल्या.

...तर कोरोनाला थोपवणे शक्य -

मुंबईत कोरोना वाढत असल्याने महानगरपालिकेने चाचण्यांवर अधिक भर दिला आहे. कोरोना वाढण्यासाठी ५ टक्के मुंबईकरांची बेफिकिरी आणि बेजाबदारपणा कारणीभूत आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, लोकल, प्रार्थना स्थळे या ठिकाणी विनामास्क फिरू नये. मुंबईकरांनी राज्य सरकार आणि पालिकेच्या सर्व नियमांचे पालन केले तर कोरोनाला थोपवणे शक्य असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईकरांची साथ हवी -

कोरोनाचे संकट पुन्हा मोठे होऊ पाहत आहे. मात्र, मुंबईकरांनी सहकार्य केले तर या संकटाला मोठे होण्यापासून रोखता येईल. त्यासाठी मुंबईकरांची साथ हवी, असे आवाहनही महापौरांनी केले. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर शनिवार आणि रविवारी दहिसर परिसराचा दौरा करणार आहेत. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्या नागरिकांना करणार आहेत.

हेही वाचा -सचिन वाझेंना अँटिलियाजवळ नेत एनआयएने केले गुन्ह्याचे नाट्य रुपांतर

ABOUT THE AUTHOR

...view details