महाराष्ट्र

maharashtra

सोशल मीडियातील जाहिरातींपासून सावध! ढोंगी ज्योतिषी बनून महिलेला घातला 16 हजारांचा गंडा, जळगावमधून दोघांना अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 7:44 AM IST

Updated : Dec 8, 2023, 10:41 PM IST

Online Fraud : सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून फसवणूक करण्यात येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. अशीच एक घटना शिवडी परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.

fake astrologer cheated a woman of 16 thousand  Police arrested two accused
ढोंगी ज्योतिष बनून महिलेला घातला 16 हजारांचा गंडा

मुंबई Online Fraud : शिवडी परिसरातील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं इंस्टाग्रामवर स्वघोषित ज्योतिषाची जाहिरात बघितली. त्यानंतर महिला या बनावटी जाहिरातीदारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर 16 हजार रुपये गमावून बसली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात 2 डिसेंबर रोजी भारतीय दंड संविधान कलम 419, 420 आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क आणि 66 ड अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

जाहिरातीत काय होतं? : महिलेनं इंस्टाग्रामवर एक जाहिरात बघितली. ज्यात लिहिलेलं होतं की, समस्या नाही असा माणूस नाही, उपाय नाही अशी समस्या नाही, भारताचे सुप्रसिध्द ज्योतिषी जोशी गुरुजी आपल्या अनेक समस्यांचं फोनवरच निवारण करतील. एक फोन आपलं भाग्य बदलू शकते', अशी जाहिरात सागर जोशी या इंस्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आली होती. तसंच या जाहिरातीसह व्हॉट्सअ‍ॅपची लिंकही देण्यात आली होती.


अशी झाली फसवणूक : जाहिरात बघून महिलेनं दिलेल्या लिंकवर क्लिक केलं. लिंक उघडताच तिला 151 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर महिलेनं ते पैसे ऑनलाइन पद्धतीनं सेंड केले. पैसे दिल्यानंतर महिलेला फोन आला. तिला तिची समस्या विचारण्यात आली. महिलेला तिची व पतीची कुंडली दाखवायची होती. कुंडली बघितल्यानंतर 'तुमच्या कुंडलीत गंभीर दोष असल्यानं तुमचं तुमच्या पतीसोबत जमत नाही. तसंच या समस्येचं निवारण करण्यासाठी 16 हजार रुपये खर्च येईल', असंही सांगण्यात आलं. हे ऐकून महिला त्यांच्या जाळ्यात फसली. तिनं दुसऱ्याचं दिवशी 16 हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवले.

फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच झाली सावध :त्यानंतर महिलेला होमहवन करतानाचा एक व्हिडिओ पाठवण्यात आला. व्हिडिओ पाठवल्याच्या पुढच्याच क्षणी महिलेला फोन आला की, गुरुजी ग्रह शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं त्यांना खूप त्रास होतोय. अजून शांती करावी लागेल. त्यासाठी ताबडतोब आणखी हवन साहित्य खरेदी करावं लागेल. तसंच हवन पूर्ण न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही महिलेला देण्यात आली. महिलेनं घाबरून 50 हजार रुपये पाठवले. मात्र दुसऱ्याच क्षणी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं वेळ न घालवता 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर फोन करत स्वतःचं खातं गोठवलं. जेणेकरून 50 हजार रुपये दुसऱ्या खात्यात जमा झाले नाही.

"दोन्ही आरोपींविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कलम दाखल करण्यात आले आहे"- राहुल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, शिवडी पोलीस ठाणे

दोघांना अटक :या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिवडी पोलीस ठाण्याच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत 3 डिसेंबर रोजी जळगावमधून आरोपी सागर देविकांत जोशी (वय 22) आणि निलेश जोशी (वय 24) या दोघांना अटक केलं. तसंच हे दोन्ही आरोपी शेजारी राहत असून दोघंही शेती करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे यांनी दिलीय.

हेही वाचा -

  1. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून भोंदू बाबानं पळविले १८ लाख रुपये, पाहा कसा घातला तरुणाला गंडा
  2. Cyber Crime Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 8 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये कोट्यवधींचा गंडा
  3. Mumbai Crime : पीएफ अकाउंटमध्ये 11 कोटी रुपये जमा झाल्याची मारली थाप, 71 वर्षीय वृद्धेला चार कोटींचा गंडा
Last Updated : Dec 8, 2023, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details