महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Politics Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' आठवड्यात? सर्वांची उत्कंठा शिगेला

By

Published : May 8, 2023, 12:29 PM IST

राज्यातील सत्तासंघर्षावर तब्बल नऊ महिने युक्तिवाद झाल्यानंतर आता याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हा निकाल फक्त राज्यासाठीच महत्त्वाचा नसून या निकालावर देशातील भविष्यातील राजकीय घडामोडी ही ठरणार आहे. त्यामुळे हा निकाल अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्याला महिना होत आला तरी अजून न्यायालयाने निकाल दिला नसल्याने सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. ठाकरे त्याचबरोबर शिंदे गटाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. भाजपमध्येही अस्वस्थता आहे.

Maharashtra Politics Crisis
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

मुंबई :एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ घटनेचे पदावरून उद्धव ठाकरे यांनी केलेली हकालपट्टी, त्याचबरोबर शिंदे यांनी या पदावर स्वतःची केलेली नियुक्ती या सर्व गोष्टी वैध आहेत का? त्याचबरोबर मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू की भरत गोगावले, त्यांची करण्यात आलेली नियुक्ती वैध आहे का? या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निर्णय देणार आहे. या निर्णयावरून अनेक तर्कवितर्क रंगवले जात आहेत. अखेरकार निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन असणार आहे.

पाच सदस्यीय घटनापिठाचा निकाल :आतापर्यंत या खटल्यांमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये अरुणाचल विधानसभा अध्यक्ष नबम रेबिया प्रकरणी प्रामुख्याने युक्तिवाद झाले आहेत. विधानसभा अध्यक्षंविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली आहे. तर त्यावर सभागृहात निर्णय होईपर्यंत त्यांना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर कुठलाही निर्णय देता येणार नाही, असा पाच सदस्यीय घटनापिठाचा निकाल आहे. त्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापिठाकडे पाठवावे का? या मुद्द्याचा घटनापीठ विचार करू शकते.


अनेक तर्क वितर्क :राज्यघटनेत नमूद केलेल्या दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार जर का दोन तृतीयांशाहून अधिक आमदारांचा गट फुटला ,तर त्यांना अन्य पक्षात विलीन होण्याचे बंधन असते. परंतु शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन झालेला नसून आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे. त्याबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तोच मुळ पक्ष असल्याचे मान्य करून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह सुद्धा त्यांना बहाल केले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने बंडखोर आमदारांवर बजावलेल्या अपात्रतेच्या याचिकांचे भवितव्य न्यायालयात ठरवले जाते की, विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविले जाते. हाच मुद्दा कायदेशीर व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. सर न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठापुढे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.


आठवडा अतिशय महत्त्वाचा :या अतिशय महत्त्वाच्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत बोलताना ज्येष्ठ विधीतज्ञ डॉक्टर उज्वल निकम म्हणाले आहेत की, सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठातील काही न्यायमूर्ती हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे हा निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. घटनापिठातील न्यायमूर्ती एम आर शहा हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी म्हणजेच येत्या चार ते पाच दिवसात घटनापीठ निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचेही निकम यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा सत्ता संघर्षावर यापूर्वीही अनेकदा भाष्य केले आहे. हा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या आठवड्यात अनेक राजकीय घडामोडी घडतील, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : Maharashtra Politics : सत्ता संघर्षानंतर राज्यात नवी समीकरणे? जाणून घ्या...
हेही वाचा : Legal Experts: हिंदुत्वाच्या भोवती फिरणारी चिन्ह आणि आयोगाचा पक्षपातीपणा; कायदे तज्ञांचा आरोप
हेही वाचा : Aseem Sarode : राज्यात सत्ता बदल होणार? 'त्या' ट्विटबद्दल आसीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details