महाराष्ट्र

maharashtra

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह विविध नेत्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 11:07 AM IST

Updated : Dec 6, 2023, 11:25 AM IST

Mahaparinirvan Diwas 2023  : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला आहे. आज संपूर्ण देश महामानवाला अभिवादन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं.

Mahaparinirvan Diwas 2023
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ व्या महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षीप्रमाणं या वर्षीसुद्धा मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे. समाजाला दिशा देणाऱ्या बाबासाहेबांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा महामानवाला अभिवादन करत ते बाबासाहेबांच्या योगदानापुढं नतमस्तक झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं.

सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते : पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. 'भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी जीवन समर्पित केलं. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो', असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

  • विनम्रतापूर्वक अभिवादन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन."

हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की,"संविधानाची मांडणी करून मानवी मूल्यांची पायाभरणी करणारे, तसेच लोकशाही बळकट करणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि विचारवंत, बोधिसत्व, ज्ञानसूर्य, क्रांतिसूर्य, महामानव, युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. बाबासाहेबांनी दिलेली एकतेची, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण आपण सगळेच जोपासु, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."

हेही वाचा :

  1. महापरिनिर्वाण दिन; कोल्हापुरातील 'या' गावात आहेत डॉ आंबेडकरांच्या अस्थी, 6 डिसेंबरला घेता येणार दर्शन
  2. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आज सुट्टी जाहीर, अनुयायांसाठी रेल्वेकडून देण्यात येणार 'या' विशेष सेवा!
  3. उच्च न्यायालयाच्या कोर्ट मॅनेजर्सना कायम करा; उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा
Last Updated : Dec 6, 2023, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details