महाराष्ट्र

maharashtra

Jowari Bajri On Ration Card : आनंदाची बातमी! आता लवकरच ज्वारी, बाजरीसुद्धा मिळणार शिधापत्रिकेवर

By

Published : May 16, 2023, 7:45 PM IST

Updated : May 16, 2023, 9:30 PM IST

संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्य सरकारने ही तृणधान्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी आता शिधापत्रिकेवर ज्वारी, बाजरी देता येईल का याबाबत विचार सुरू केला आहे. त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी दिली आहे.

Jowari Bajri On Ration Card
Jowari Bajri On Ration Card

डॉ. रेवण बागल माहिती देतांना

मुंबई :संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र सरकारने, राज्य सरकारनेही हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने तृणधान्य अधिकाधिक आहारात समाविष्ट व्हावीत, तृणधान्य पिकवण्याला चालना मिळावी, तृणधान्याला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. याबाबतची माहिती अन्न, पुरवठा विभागाच्या सचिवांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. या धान्यांमध्ये गहू तांदूळ या रोजच्या धान्यांबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कुटकी अशा तृणधान्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

धान्याचे हमी भाव

तृण धान्याच्या प्रोत्साहनासाठी शिधापत्रिकेवर :सध्या राज्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना गहू, तांदूळ हे शिधापत्रिकेवर दिले जातात. सध्या राज्यातील बीपीएलधारक, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या माध्यमातून सात कोटी शिधापत्रिकाधारकांना दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू दिले जातात. या ऐवजी किंवा याबरोबरच आता ज्वारी, बाजरी शिधापत्रिकेवर देता येईल का याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार असून त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती विभागाच्या सचिवांनी दिली आहे. काही वर्षांपासून राज्यातील ज्वारी, बाजरीचे उत्पादन घटले आहे. हे उत्पादन वाढवण्यासाठी ही राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


काय आहे उत्पादनाचा आलेख? :तृणधान्य पिकांखालील क्षेत्रात मोठी घट होत आहे. 2010 - 11 ते 2020 - 21 या कालावधीत पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र 57% घटले आहे. या कालावधीत उत्पादन 12 टक्के घटले आहे. मात्र, उत्पादकतेत 12 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. खरीप ज्वारी पिकाचे क्षेत्र 80% तर, उत्पादन 87% झाले असून उत्पादकतेत सदतीस टक्के घट झाली आहे. रब्बी ज्वारी पिकाचे क्षेत्र ५३ टक्के उत्पादन 27 टक्के घटले आहे. मात्र, उत्पादकते 55% वाढ झाल्याचे दिसून येते. बाजरी पिकाचे क्षेत्र ५१ टक्के उत्पादन 59 टक्के तर उत्पादकता 17 टक्क्यांनी घटली आहे. नाचणी पिकाखालील क्षेत्र 39 टक्के उत्पादन 21% घटले आहे तथापि उत्पादकतेत 29 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर येते आहे.

पिकांना वाढीव हमीभाव? :या तृणधान्य पिकांना उत्पादन वाढीसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सचिवांनी दिली. त्यामुळे ज्वारीसाठी 73% बाजरीसाठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88% इतकी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. ज्वारीसाठी सन 2017-18 मध्ये प्रतिक्विंटन सतराशे पंचवीस रुपये असलेला भाव 2022 - 23 साठी 2 हजार 990 करण्यात आला आहे बाजरीसाठी चौदाशे पंचवीस वरून 2 हजार 350 रुपये आणि नाचणीसाठी 1 हजार 900 रुपयांवरून 3 हजार 578 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव करण्यात आला आहे.

किती होते लागवड? :राज्यात ज्वारी पिकाचे क्षेत्र सोळा पूर्णांक 37 लाख हेक्टर इतके आहे.
बाजरी पिकाचे क्षेत्र पाच पूर्णांक चार लाख हेक्टर इतके आहे तर नाचणी पिकाचे क्षेत्र 0.77 लाख हेक्टर इतके आहे.

ज्वारीची घसरण :महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22 मधील आकडेवारीनुसार, 2000-01 मध्ये एकूण लागवडीच्या क्षेत्रापैकी 5 हजार 74 हजार हेक्टर (38.06 टक्के) क्षेत्र ज्वारीच्या लागवडीखाली होते. 2011-12 मध्ये हे क्षेत्र 4 हजार 60 हजार हेक्‍टरवर (31.17 टक्के) आले. 2021-22 मध्ये ते 2 हजार 320 हजार हेक्टर (19.87 टक्के) पर्यंत घसरले. उत्पादनाचा उतरता आलेख देखील आहे. 2000-01 मध्ये 3 हजार 988 हजार टन उत्पादन झाले. 2011-12 मध्ये 3 हजार 452 हजार टन, तर 2021-22 मध्ये 2 हजार 186 हजार टन उत्पादन झाले. यंदा ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तृणधान्यांमुळे मिळते हे पोषणमूल्य : तृणधान्यांमुळे नेमके काय पोषण मिळते यासंदर्भात सुप्रसिद्ध डॉक्टर रेवण बागल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ज्वारी च्या सेवनामुळे रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित करते. रक्ताभिसरण वाढवते. ज्वारी वजन कमी करण्यास मदत करते. हाडांच्या आरोग्यासाठी ज्वारी उपयुक्त ठरते. शरीरातील ऊर्जा पातळी सुधारते. तसेच ह्रदयाचे आरोग्यही ज्वारीमुळे सुधारते.

आहारात जास्तीत जास्त पौष्टिक तृणधान्यांचा वापर केला पाहिजे- डॉक्टर रेवण बागल

बाजरीच्या आहारातील समावेशामुळे कॅल्शियम, विटामिन A, B व फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, ॲनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. नाचणी ही शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ॲनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त पौष्टिक तृणधान्यांचा वापर केला पाहिजे असे डॉक्टर बागल यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
  2. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  3. Pradeep Kurulkar Judicial Custody : प्रदीप कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी; येरवडा कारागृहात होणार रवानगी
Last Updated :May 16, 2023, 9:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details