महाराष्ट्र

maharashtra

Dahi Handi २०२३ : मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांवर बक्षिसांचा वर्षाव

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 1:33 PM IST

Updated : Sep 7, 2023, 1:39 PM IST

Dahi Handi २०२३ : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दहीहंडी उत्सवाची यंदा क्रेझ पाहायला मिळत आहे. मुंबईतील आणि ठाण्यातील दहीहंडी आयोजकांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात गोविंदा पथकांवर केली आहे.

Dahi Handi 2023
मुंबईतील दहीहंडी

मुंबई : Dahi Handi २०२३ : मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ५० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर प्रत्येक पथकास २.५१ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरीकडं मुंबईत भाजपाच्या 'परिवर्तन' दहीहंडी उत्सवासाठी ५१ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. शिंदे गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदार संघात गौतमी पाटीलचा (Gautami Patil) नृत्याचा कार्यक्रम आयोजित करून गोविंदा पथकांना आकर्षित केले आहे.

लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा : महाराष्ट्रासाठी २०२४ हे निवडणूकांचे वर्ष ठरणार आहे. स्थानिक पातळीवरील पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांपासून ते लोकसभा-विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकांचा बार या एकाच वर्षात उडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई व ठाण्यातील गोविंद पथकांची मने जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. या वर्षी दहीहंड्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर बक्षिसांची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार असलेल्या आयोजकांनी तर या उत्सवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.

गौतमी पाटील गोविंदा पथकांचे आकर्षण : शिंदे गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत गौतमी पाटील गोविंदा पथकांचे आकर्षण ठरणार आहे. त्याबरोबर 51 लाखांचे बक्षीस आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील ठाण्यातील टेंभीनाका येथील उत्सवात प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. एकट्या मुख्यमंत्र्यांच्या दहीहंडी उत्सवात ५० लाखांहून अधिक किंमतीची बक्षिसांची खैरात केली जाणार आहे.

दहीहंडीत लाखोंची बक्षिसे : ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी मिळून सुमारे १ हजार ४३१ दहीहंडी उत्सव आयोजित केले जातात. मुंबईतही हजाराहून अधिक दहीहंडीचे आयोजन केले जाते. यंदा लालबागमध्ये भाजपा नेते गोपाळ दळवी आणि दक्षिण मुंबईतील भुलेश्वर काळबादेवी परिसरात शिंदे सेनेचे संतोष काशीद यांची दहीहंडी वाढली आहे. मुंबईतील लालबागच्या दहीहंडीत सुमारे २५ लाखांची बक्षिसे वाटली जाणार आहेत. सुमारे ३०० गोविंदा पथके येथे येण्याची शक्यता आहे. भुलेश्वर 'काळबादेवी परिसरातील दहीहंडीत ११ लाख रुपयांची बक्षिसे वाटली जाणार आहेत, अशी माहिती दहीहंडी संघटनेचे बाळा पडलेकर यांनी दिली.

महिला गोविंदा पथकासाठी बक्षिसांची खैरात : ठाण्यात टेंभीनाका येथील मंडळातर्फे महिला गोविंदा (Mahila Govinda squad) पथकासाठी १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२ हजार, सहा थरांसाठी ८ हजार, पाच थरांसाठी ६ हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.

‘परिवर्तन’ दहीहंडीचे आयोजन : वरळी येथील जांबोरी मैदानावर अनेक वर्षांपासून माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, आता याच मैदानावर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘परिवर्तन’ दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. परिवर्तन दहीहंडीचे आयोजक संतोष पांडे यांनी सांगितले की, यावर्षी एकूण 51 लाखांची बक्षिसे येथील गोविंदा पथकांना वाटली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे 560 गोविंदा पथकांनी ‘परिवर्तन’ दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

मुंबईत सुमारे 250 दहीहंडया : शिवसेना, उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना भवन येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सुमारे 250 दहीहंडया आहेत. त्यात या वर्षी आगामी निवडणुकीतील इच्छुकांची भर पडली आहे. मात्र या वर्षी दहीहंडी हा उत्सव राहिला नसून, 'इव्हेंट' झाला आहे. त्यामुळे पैशाची बरसात सुरू आहे. मात्र, आमच्या दहीहंडीवर असे बक्षीस नाही, असे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले. एकूणच मुंबई आणि ठाण्यामध्ये दहीहंडी आयोजकांनी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत.

रस्त्यावर गोविंदा नको : मुंबईत आज सकाळपासूनच रस्त्यावर गोविंदा पथके फिरताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यात पावसाने आणखी भर टाकली आहे. दरम्यान, न्यायालयाने गोविंदा पथकांना इशारा दिला असून, रस्त्यावर गोविंदा आणि दहीहंडीचे आयोजन होऊ नये, मोकळ्या मैदानावर आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, असे असले तरी मुंबईसारख्या शहरात मोकळी मैदाने शिल्लक नसल्याने रस्त्यावरच उत्सवांचे आयोजन केले जाते.

हेही वाचा -

  1. Janmashtami २०२३ : साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव; चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून किर्तन सोहळा
  2. Corruption Dahi Handi: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी, पाहा व्हिडिओ
  3. Dahi Handi 2023: राज्यातील पहिलं 'तृतीयपंथी गोविंदा पथक' पुण्यात; 50 पेक्षा अधिक तृतीयपंथी दहीहंडी फोडण्यास सज्ज
Last Updated :Sep 7, 2023, 1:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details