महाराष्ट्र

maharashtra

Amravati Violence : अमरावती पोलीस आयुक्तांची किरीट सोमैयांना नोटीस; सोमैयांनी दौरा पुढे ढकलला

By

Published : Nov 16, 2021, 9:36 PM IST

१२ व १३ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया (bjp leader kirit somaiya) बुधवारी अमरावती दौऱ्यावर जाणार होते. अमरावती पोलीस आयुक्तांकडून त्यांना अमरावतीमधील परिस्थिती पाहता दौरा पुढे ढकलावा याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. यानंतर नोटीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून किरीट सोमैयांनी त्यांचा अमरावती दौरा पुढे ढकलला आहे.

bjp leader kirit somaiya
भाजप नेते किरीट सोमैया

मुंबई -१२ व १३ नोव्हेंबरला अमरावतीमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया (bjp leader kirit somaiya) बुधवारी अमरावती दौऱ्यावर जाणार होते. यावेळी दंगली दरम्यान झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासोबतच दंगल पीडितांना सुद्धा भेटणार होते. मात्र, अमरावती पोलीस आयुक्तांकडून त्यांना अमरावतीमधील परिस्थिती पाहता दौरा पुढे ढकलावा याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. यानंतर नोटीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून किरीट सोमैयांनी त्यांचा अमरावती दौरा पुढे ढकलला आहे.

भाजप नेते किरीट सोमैया याबाबत बोलताना

अमरावतीमध्ये परिस्थिती नाजूक -

भाजपचे माजी खासदार व नेते किरीट सोमैया हे बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर जाणार होते. या पद्धतीचे पत्र त्यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयाला दिले होते. मात्र, सध्या अमरावतीमध्ये अजूनही संचारबंदी चालू असल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी कुठलीही अपरिचित घटना व त्या पद्धतीचा प्रकार इथे घडू नये, म्हणून अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून किरीट सोमैयांना सतत दोन दिवसात दोन नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या नोटीसमध्ये संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शांतता अबाधित होऊन सार्वजनिक किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यासाठी सर्वस्वी किरीट सोमैया व त्यांच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर ही नोटीस पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली जाईल, असे म्हटले आहे. (Amravati cop notice to kirit somaiya)

अमरावती आयुक्तालयाची नोटीस

हेही वाचा -Amravati Violence : इंटरनेट सेवा ठप्प; ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम झाले बंद

पालकमंत्र्यांची ही विनंती -

अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा किरीट सोमैया यांनी त्यांचा दौरा १५ दिवसानंतर करावा, असे सांगितले आहे. एकंदरीत सध्याची अमरावतीमधील परिस्थिती नाजूक असून या परिस्थितीत त्यांनी दौरा करू नये, असेही म्हटलं आहे.

अमरावतीत कडक बंदोबस्त -

दिनांक १२ व १३ नोव्हेंबरला अमरावती शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवून सामाजिक शांततेस बाधा निर्माण झालेली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. अमरावती शहरामध्ये जातीय तणाव वाढून सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान व जीवितहानी होणार नाहीस, म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया कलम १४४ (१) नुसार संचारबंदी (कर्फ्यू)चे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यास व कारण नसताना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details