महाराष्ट्र

maharashtra

गर्भवतींनो सावधान..! मुंबईत कोरोनाग्रस्त मातेकडून नाळेद्वारे बाळाला संसर्ग; बाळाचा मृत्यू

By

Published : Aug 24, 2020, 9:02 PM IST

A baby got infected through umbilical cord of a corona infected mother and died
गर्भवतींनो सावधान!.. मुंबईत कोरोनाग्रस्त मातेकडून नाळेद्वारे बाळाला संसर्ग; बाळाचा मृत्यू

मुंबईत कोरोनाग्रस्त मातेकडून पोटातील बाळाला नाळेद्वारे कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करावा लागला आहे. नाळेतून संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना असून यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञही चिंतेत आहेत.

मुंबई - कोरोनाच्या संकटात आता गर्भवती मातांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त मातेकडून पोटातील बाळाला नाळेद्वारे कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करावा लागला आहे. नाळेतून संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना असून यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञही चिंतेत आहेत.

डॉ स्मिता महाले माहिती देताना..

आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडेक्टिव्ह हेल्थ (NIRRH) परळने यावर अभ्यास सुरू केला आहे. यात महाराष्ट्रातील 18 मेडिकल कॉलेजमध्ये 'प्रेग कोविड' डाटा नोंदणी करत यावर अभ्यास केला जाणार आहे. नाळेची तपासणी करून यावर काही औषध निर्माण करता येईल का? याचाही अभ्यास केला जाणार असल्याची माहिती संशोधक डॉ. दीपक मोदी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली. पण सध्या तरी गर्भवती मातांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवणे, हाच यावर एकमेव उपाय असल्याचे म्हणत त्यांनी गर्भवतीना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर आणि सायन रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेणाऱ्या 1 हजाराहून अधिक गर्भवती महिलांनी कोरोनावर मात केली आहे. तर 700 हून अधिकांनी गोंडस बाळांना जन्म दिला आहे. यातील एक-दोन बाळं वगळली तर सर्व बाळं कोरोना निगेटिव्ह जन्माला आली आहेत. यामुळे गर्भवतींना मोठा दिलासा मिळाला होता. पण आता कंदिवलीतील ईएसआयसी रुग्णालयात झालेल्या घटनेमुळे गर्भवतील महिलांची डोकेदुखी वाढली आहे. एका दीड महिन्याच्या गर्भवती मातेला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ती कोरोनामुक्त झाली. त्यानंतर ती दीड महिन्यानंतर नियमित तपासणीसाठी गेली असता सोनोग्राफीमध्ये बाळाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आणि तात्काळ तिचा गर्भपात करत मृत बाळाला बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर पुन्हा मातेची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. पण बाळ मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत झाल्याची बाब समोर आली. त्यातही धक्कादायक म्हणजे आई आणि बाळाला जोडणाऱ्या नाळेतून कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यामुळे बाळ दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेनंतर आरोग्य क्षेत्रासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आता 'प्रेग कोविड' मोहीम हाती घेतल्याची माहिती आयसीएमआर आणि एनआयआरआरएचच्या संचालिका डॉ. स्मिता महाले यांनी दिली. त्यानुसार आता महाराष्ट्रातील 18 महाविद्यालयाला गर्भवतीचा सर्व डाटा जमा करण्याचे आणि त्यांची नोंद घेण्याचे सूचना आयसीएमआर आणि एनआयआरआरएचकडून करण्यात आल्याचे संशोधक डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले. तर भारतात ही व्हर्टिकल ट्रान्समिशन होत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाल्याचे म्हणत डॉ. महाले यांनी आता यावर अधिकाधिक अभ्यास होण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details