जळगाव -माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या हत्येचे १० महिन्यांनी तीव्र पडसाद उमटले आहेत. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अशोक सपकाळे यांच्या २ मुलांनी आपल्या साथीदारांना जामिनावर असलेल्या संशयित आरोपीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार ४ गुंडांनी संशयिताच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत तो संशयित बचावला. आज (गुरुवारी) सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. आकाश मुरलीधर सपकाळे (वय २४, रा. कांचननगर, जळगाव) असे गोळीबारात बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमका घटनाक्रम?
कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर गयभू सपकाळे यांचा मुलगा आकाश सपकाळे हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८) याच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आकाशला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोक सपकाळे यांची मुलं बाबू व सोनू सपकाळे यांनी त्यांचे साथीदार विक्की अलोने, मिलिंद सकट, बंटी उर्फ प्रद्युम्न नंदू महाले व राहुल भालेराव यांना सुपारी दिली होती. त्यानुसार आज सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास हे चौघजण रिक्षाने कांचननगरात आकाशच्या घरी आले. तेव्हा मुरलीधर सपकाळे व त्यांची दोन्ही मुले आकाश व नितीन सपकाळे हे घरात झोपलेले होते. विकी व मिलिंद यांनी आकाशवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बालंबाल बचावले. हल्लेखोरांनी पिस्तूलातून ४ राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी झटापटीत आकाशच्या हाताच्या करंगळीला लागल्याने तो जखमी झाला. एक गोळी घरातील भिंतीला लागली.
पळून जाताना विक्की गंभीर जखमी-
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांसोबत आकाश व नितीन यांची जोरदार झटापट झाली. या झटापटीनंतर पळून जाताना घराबाहेर विकी अलोने याचा पाय गटारीत गेल्याने तो खाली पडला. याचवेळी त्याचे साथीदार मिलिंद, बंटी व राहुल हे पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा मुरलीधर सपकाळे यांच्यासह आकाश, नितीन व रुपेश सपकाळे यांनी विकी अलोने याला लाकडी दांडक्याने, दगडाने जबर मारहाण केली. आकाशने चाकूने वार केल्याने विक्की गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळावरून पिस्तूल, राऊंड जप्त-
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, फायर झालेले ४ राऊंड तसेच संशयित आरोपीचा मोबाईल, रुमाल असे साहित्य जप्त केले. जखमी विक्की व आकाशला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी पोलिसांनी विकीचा जबाब नोंदवला. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकाश सपकाळे व विक्की अलोने या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी दोन्ही गटातील १० जणांना अटक केली आहे.