महाराष्ट्र

maharashtra

आतापर्यंत राज्यातील 'या' तीन मंत्र्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीत पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

By

Published : Nov 17, 2020, 9:08 PM IST

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील पात्तागुडम पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस कुटुंबाला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.

gadchiroli police
गडचिरोली पोलीस

गडचिरोली - आदिवासीबहुल व नक्षल कारवायांसाठी अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांची दिवाळी नेहमी 'ऑन ड्युटी'च साजरी होते. नक्षलवाद्यांशी दोन हात करताना येथे कार्यरत पोलीस जवानांना दरवर्षीच कुटुंबापासून दूर राहून दिवाळी साजरी करावी लागते. मात्र, यावर्षी येथील पोलिसांची दिवाळी काहीशी वेगळी ठरली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील पात्तागुडम पोलीस मदत केंद्रात कार्यरत पोलीस कुटुंबाला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.

नगर विकास मंत्रीही दिवाळी साजरी करण्यासाठी गडचिरोलीत

यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील अशा हालेवारा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत पोलीस जवानांचा उत्साह वाढण्यास मदत मिळाली.

आर. आर. पाटील यांनीही नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली होती दिवाळी

महत्त्वाचे म्हणजे, गेल्या 15 वर्षाचा इतिहास बघितल्यास यापूर्वी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी तीनवेळा पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत साजरी केली दिवाळी

दिवाळीसारखा उत्सव हा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नक्षलग्रस्त भागातील पोलिसांमध्ये जाऊन साजरा केला. देशमुख यांच्या या कार्यक्रमामुळे राज्यभरात त्यांच्या या नियोजनाचे कौतुक केले जात आहे. तसेच यामुळे अनेकांनी माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

केंद्रीयमंत्री देखील सैनिकांसोबत साजरे करतात सण-उत्सव -

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सैनिकांना बळ आणि त्यांच्यातील उत्साह निर्माण करण्यासाठी अनेकदा दिवाळीचा उत्सव हा त्यांच्यामध्ये जाऊन साजरा केला होता. त्यांच्यानंतर माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, माजी संरक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव सैनिकांच्या छावणीवर जाऊन साजरे केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षापासून दिवाळीचा उत्सव देशाच्या सैनिकांसोबत साजरा करण्याचा एक नवीन पायंडा निर्माण केला आहे.

हेही वाचा -गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांनी साजरी केली दिवाळी

ABOUT THE AUTHOR

...view details