ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांनी साजरी केली दिवाळी

author img

By

Published : Nov 15, 2020, 12:25 PM IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्निक अतिदुर्गम पातागुडमला भागात तैनात असलेल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरा केली. या दरम्यान, त्यांनी नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली.

Anil Deshmukh celebrates Diwali with jawans at Gadchiroli PS
गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांनी साजरी केली दिवाळी

गडचिरोली - नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या गडचिरोली पोलिसांसोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्नीक दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम पातागुडमला भागाला दिवाळीनिमित्त भेट देत गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस जवानांचा उत्साह वाढविला.

पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस
मंत्री देशमुख यांनी शनिवारी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्यासह हेलीकॉप्टरने सिरोंचा तालुक्यातील पातागुडमला पोहोचले. दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृहमंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख दाम्पत्याने आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हे ठिकाण गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून 300 किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख बोलताना...
पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून तुमच्यामध्ये आलोय

भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या जवानांना दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून, आपल्या आई-वडिलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळांपासून दूर आहेत याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटले की मी तुमच्यात यायला हवे. माझे पोलीस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरा करत बसलो असतो, तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवले तुमच्यामध्ये यायचे आणि काही वेळ तुमच्या सोबत घालवायचा, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांचे प्रश्न तातडीने सोडवणार
भेटीदरम्यान गडचिरोली पोलीस क्षेत्राचे उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था बराकमध्ये केली आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत राहता येत नाही, असे सांगितले. तेव्हा गृहमंत्र्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या इतर अडचणी समूजन घेत सरकार सदैव पोलीस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, सिरोंचा विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत स्वामी उपस्थित होते.

हेही वाचा - आदिवासींची अशीही थट्टा... पूल बांधले मात्र रस्त्याचा पत्ता नाही; लाखोंचा खर्च पाण्यात

हेही वाचा - नक्षलवादी संघटना आक्रमक ; 10 नोव्हेंबरला गडचिरोलीत 'जिल्हा बंद'चे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.