महाराष्ट्र

maharashtra

Online Booking scam : ठाकूर बंधूंचा जमीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला; ताडोबा ऑनलाइन बुकिंग घोटाळा

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 10:01 PM IST

ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग बंद झाली आहे. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फटका असला आहे.(Online Booking scam)

online booking scam
ताडोबा ऑनलाइन बुकिंग घोटाळा

चंद्रपूर :ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या कंत्राटी कंपनीने तब्बल साडेबारा कोटींची अफरातफर केल्याचा घोटाळा नुकताच समोर आला होता. या प्रकरणात आरोपी असलेले अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे ठाकूर बंधूंच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यापासून हे बंधू भूमिगत झाले होते. मात्र सुनावणी दरम्यान न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे ठाकूर बंधूंना आत्मसमर्पण करावे लागेल अथवा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. यापक्ररणी पोलिस या दोघांचाही शोध घेत आहेत. (Online Booking scam)



ऑनलाइन सफारी बुकिंग: चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या नावाच्या कंपनीसोबत ताडोबा-अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक यांनी करार केला. या करारानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना सफारीसाठी ऑनलाईन नोंदणी यांच्याकडून करावी लागत होती. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन सख्या भावंडांची आहे. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकत होती. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र या कंपनीने केवळ १० कोटी ६५ लाख जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. (Chandrapur News)

ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल: कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजाराला चुना लावला. चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आली. सरकारी पैशांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अभिषेक आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल होताच अभिषेक व रोहित ठाकूर या दोघांनी चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तपास उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान जिल्हा न्यायालयाने अभिषेक व रोहित ठाकूर या दोन्ही भावंडांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता या दोन्ही भावंडांना एक तर नागपूर खंडपीठात जामिनासाठी धाव घ्यावी लागणार आहे. किंवा आर्थिक गुन्हे शाखेसमोर शरणागती पत्करावी लागणार आहे.



ऑनलाइन बुकिंग बंद, रोजगार ठप्प : ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यहारामुळे सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीची ऑनलाईन बुकिंग बंद झाली आहे. (Tadoba Safari Online Booking )केवळ ऑफलाईन बुकिंग सुरू आहे. त्याचा नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीकाळातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. सफारी बुकिंग बंद असल्याने रिसॉर्ट बुकिंग, जिप्सी बुकिंग, टॅक्सी बुकिंग सर्वच ठप्प पडले आहे. या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेन्द्र रामगावकर यांना विचारले असता, ताडोबातील पर्यटकांना त्रास होवू नये यासाठी येत्या आठवड्याभरात नविन ऑनलाईन साईट सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details