महाराष्ट्र

maharashtra

Amravati News : स्मशानाच्या मार्गात खड्डा; मुसळधार पावसामुळे दोन महिन्यात वाहून गेला पूल; अंत्यसंस्कार करायचे कुठे?

By

Published : Aug 6, 2023, 7:57 PM IST

अमरावतीत चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे अवघ्या दोन महिन्यापूर्वीच गावातील स्मशानभूमीला जोडणारा रस्ता आणि स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोरच बांधण्यात आलेला पूल चक्क वाहून गेला. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या जळका जगताप या गावात हा प्रकार घडला आहे. आता गावात कोणी दगावले तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यायचा कुठे असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.

Amravati News
स्मशानाच्या मार्गात खड्डडा

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातून वाहत येणारा बेलमंडळी नाला हा जळका जगताप या गावातून वाहत पुढे जातो. या नाल्याच्या काठावर गावाची स्मशानभूमी आणि अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. धामणगाव रेल्वे येथील जलसंपदा विभागाच्या वतीने बेलमंडळी ह्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम मे महिन्यात सुरू झाले. या कामातच जळका जगताप येथील स्मशानभूमीला जोडणारा रस्ता देखील बांधण्यात आला. स्मशानभूमीच्या अगदी प्रवेशद्वाराज जवळच असणारा पूल मुसळधार पावसात पूर्णतः वाहून गेल्यामुळे स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोर मोठा खड्डा पडला. मे महिन्याच्या अखेरीस बांधण्यात आलेला रस्ता आणि पूल दोन महिने देखील टिकू शकला नाही. यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.



शेतीचा रस्ताही झाला बंद: स्मशानभूमीच्या दोन्ही बाजूला ग्रामस्थांची शेती आहे. नाल्यावर बांधलेला पूल वाहून गेल्यामुळे या मार्गावर मोठा खड्डा पडला आहे. स्मशानभूमीत कोणताही व्यक्ती पायी देखील जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे स्मशानभूमी लगतच्या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता शेतीच्या कामाचे दिवस असताना देखील शेतात जाता येत नाही. आता शेतीचे काम खऱ्या अर्थाने सुरू झाले असताना शेतात जाता येत नाही, यामुळे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. शासनाने आमच्या अडचणीची दखल घ्यावी आणि आम्हाला शेतात जाण्याकरिता सोय करून द्यावी अशी मागणी, सुनील रावळे यांनी केली.



ग्रामस्थांनी सांगूनही कोणी ऐकले नाही : आम्हाला आमच्या गावची रूपरेषा कळते. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाल्यावर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यावरील दोन्ही फुलांची रचना कशी व्हावी यासंदर्भात आम्ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह, पुण्यातील कंत्राट दाराशी बोललो. नेमक्या अडचणी कुठे येतील हे देखील सांगितले. मात्र आम्ही दिलेल्या सल्ल्याची कोणीही दखल घेतली नाही. आज आम्हाला संकटाचा सामना करावा लागत असल्याचे, गणेश ठाकूर यांनी सांगितले.



मोठ्या खड्ड्यांमुळे जीविताला भीती : गावालगत वाहणाऱ्या या नाल्याला अनेक ठिकाणी लहान मोठे झरे येऊन मिळतात. हे सर्व झरे एकत्रित करून नाल्याचे खोलीकरण व्हायला हवे होते. मात्र असे काही न करता या ठिकाणी कंत्राटदाराने सहा फूट खोल मोठा खड्डा खोदून ठेवला. या खड्ड्यात आता पावसाचे पाणी साचले असून या परिसरात खेळायसाठी आलेली लहान मुले किंवा जनावरे पडले तर जीवित हानी होण्याची भीती असल्याचे प्रदीप जगताप यांनी सांगितले. स्मशानभूमीला जोडणाऱ्या पुलाची रचनाच योग्य नाही. त्यावेळी कंत्राटदाराने ग्रामस्थांचे ऐकून योग्यपणे पूल बांधला असता आणि चांगला दर्जाचे साहित्य कामात वापरले असते तर ही अशी दुर्दैवी वेळ आली नसती अशी खंत, प्रदीप जगताप यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. Wedding Ceremony in Cemetery : स्मशानभूमीत पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा; Watch Video
  2. Skull Of Dead Body Missing: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची कवटी गायब; मांत्रिकाचा प्रताप
  3. Cemetery Scam Amravati : अस्तित्वात नसलेल्या स्मशानभूमीसाठी लाखो रुपये खर्च; माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details