महाराष्ट्र

maharashtra

West Vidarbha Mango: उत्तर प्रदेशातील दशहरी रुजला विदर्भात; रायवळ सोबतच मेळघाटातील आंबीन आंब्याची चवच न्यारी

By

Published : Apr 14, 2023, 8:44 AM IST

Updated : May 8, 2023, 2:04 PM IST

West Vidarbha Mango
मेळघाटाचा आंबीन आंबा चवदार ()

संपूर्ण भारतात 4000 वर्षांपासून आंबा हे फळ अस्तित्वात आहे. देशात आंब्याच्या 1500 च्या वर वाण उपलब्ध आहे. यापैकी 1000 वाणांची लागवड केली जाते. अमरावतीसह पश्चिम विदर्भात रायवळ हा गावरान आंबा अतिशय प्रसिद्ध आणि चवदार आहे. रायवळप्रमाणेच फार पूर्वी उत्तर प्रदेशातून विदर्भात आलेला दशहरी आंबा देखील आता विदर्भाच्या मातीत बहरतो आहे. जून, जुलै महिन्यात सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटातील घनदाट जंगलात आंबीन आंबा मोठ्या प्रमाणात येतो.

प्रतिक्रिया देताना प्राध्याापक अमरावती विद्यापीठ

अमरावती :उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजाच वेगळी असते. गत पंधरा-वीस वर्षांपासून रायवळ आंबा हा बाजारातून हरवला आहे. आता काही भागात मोजक्याच शेतांमध्ये रायवळ आंब्याचे वृक्ष पहायला मिळतात. रायवळ आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा इतर आंब्यांसारखा कापून खाता येत नाही. या आंब्याची कोय मोठी असते. यात रसाचे प्रमाण कमी असते. विदर्भात खास पाहुणचारासाठी ओळखला जाणारा रायवळ आंबा पूर्वीप्रमाणेच पुन्हा बाजारात यावा. प्रत्येक घरात पोहोचावा, यासाठी महत्त्वाचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषी तज्ञ प्राध्यापक राजेश पाटील 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. आज अमरावती जिल्ह्यात अचलपूर चांदूरबाजार यासह अनेक भागात असणाऱ्या रायवळ आंब्याचे वृक्ष टिकावे, ते वाढावी यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील प्राध्यापक राजेश पाटील म्हणाले.


उत्तर प्रदेशातील दशहरी रुजला विदर्भात :उत्तर प्रदेशात लखनऊ शहराजवळ असणाऱ्या दशहरी या गावातील आंबा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. दशहरी या गावाच्या नावावरच ह्या आंब्याचे नाव देखील दशहरी असे पडले. फार पूर्वी हा आंबा विदर्भात आला. पश्चिम विदर्भात दशहरी आंबा अनेक भागात लावण्यात आला. विशेष म्हणजे दशहरी आंबा हा विदर्भाच्या मातीत रुजला. आता अमरावती जिल्ह्यातला दशहरी हा आंबा विदर्भात सर्वत्र मोठ्या आवडीने खाल्ला जातो, अशी माहिती देखील प्राध्यापक राजेश पाटील यांनी दिली.


विदर्भातील स्थानिक वाण झाले लुप्त :आज देशभर ज्याप्रमाणे कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच विदर्भात पूर्वी सहद्या, साखऱ्या, रायत्या, लाडू हे आंब्यांचे अतिशय अतिशय नामांकित वाण होती. हे सर्व शतायुषी वृक्ष होते. या शतायुषी वृक्षांवरून मोठ्या प्रमाणात फळे उतरायची. या शतायुषी वृक्षांचा मोठा गोलाकार घुमट व्हायचा, त्यावर 25 ते 30 हजार फळे यायची. या फळांमध्ये रस कमी असला तरी त्याची चव, रंग या वैशिष्ट्यपूर्ण बाबी होत्या. रायत्या या आंब्याचे लोणचे अतिशय चवदार बनायचे. लाडू हा आंबा लाडू सारखाच गोल यायचा, अशी माहिती देखील प्राध्यापक राजेश पाटील यांनी दिली.


भारतातून 56 टक्के आंब्याची निर्यात :देशातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बाळांचा काही भाग सोडला तर भारतभर सर्वत्र आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. आज आंब्याची जगभर भारतातून एकंदर उत्पादनाच्या 56 टक्के आंब्याची निर्यात होते. आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत, मात्र या सर्व आंब्यांमध्ये सारखेच पोषक गुण आहेत. साखरेचे प्रमाण भरपूर असणाऱ्या आंब्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा प्राप्त होते, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि आहारतज्ञ प्रा. डॉ. वैशाली धनविजय यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. सडपातळ व्यक्तींनी आंब्याचे सेवन दुधासोबत केले तर त्यांचे आरोग्य वर्धन होण्यास मदत होते.

कच्च्या कैरीमध्ये 'विटामिन सी' :विटामिन आणि मिनरल्सने आंबा हे फळ समृद्ध आहे. कच्च्या कैरीमध्ये 'विटामिन सी' मिळते. यामुळे कच्च्या कैरीचे सेवन लोणच्यासह विविध प्रकारे आपण करू शकतो. पिकलेल्या आंब्यात 'विटामिन ए'चे प्रमाण भरपूर आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी 'विटामिन ए' हे अतिशय महत्त्वाचे असून आंब्याचे सेवन या मोसमामध्ये करणे अत्यंत चांगले आहे. ज्यांना मधुमेह हा आजार जडला आहे, त्यांनी आंबे खाताना काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी आंबे खावेत, असा सल्ला देखील प्रा. डॉ. वैशाली धनविजय यांनी दिला.

हेही वाचा : Alphonso Mango: आंबा उत्पादकांना मोठा फटका;आंबा उत्पादक संघटनेच्या पत्राला केराची टोपली

Last Updated :May 8, 2023, 2:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details