Alphonso Mango: आंबा उत्पादकांना मोठा फटका;आंबा उत्पादक संघटनेच्या पत्राला केराची टोपली

author img

By

Published : Apr 13, 2023, 12:54 PM IST

Updated : Apr 13, 2023, 1:06 PM IST

Alphonso Mango
कोकणातील आंबा ()

फळगळ आणि अवकाळीचा कोकणातील आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. आंबा उत्पादक हवालदिल झाले असून राज्य शासनाने आंबा उत्पादकांना हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेने 21 मार्चला राज्य सरकारला पत्र पाठवून केली. मात्र, शासनाने संघटनेच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शासन दरबारी उपेक्षित असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

आंबा उत्पादकांना मोठा फटका

मुंबई : कोकणातील हापूस आंबा म्हटले की, लहान थोरांच्या तोंडाला पाणी सुटते. कोकणातील हापूस आंब्याची चव अत्यंत चांगली आहे. हापूसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, खनिजे असतात. अत्यंत चविष्ट असे हे फळ आहे. हापूस हा फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. कोकणात साधारणत: सव्वादोन लाख हेक्टरवर हापूस आंब्याची लागवड केली जाते. समाजाच्या सर्व स्थावर, शहरात, नगरपालिका क्षेत्रात, देशांतर्गत क्षेत्रामध्ये चांगल्या प्रतीचा आंबा मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो. एवढेच नव्हे तर जवळपास 12 ते 15 टक्के आंबा निर्यात देखील होतो, असे आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.




दलालाकडून होते फसवणूक : कोकणात आजही नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकविला जातो. आंबा विक्रीसाठी दलालांचा वापर करावा लागतो. कोकणातील विक्रेत्यांना एपीएमसीचा आधार घ्यावा लागतो. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई या एपीएमसी ठिकाणी जवळपास वर्षाला एक कोटीहून अधिक आंब्याच्या पेटीची होलसेल मार्केटमध्ये विक्री केली जाते. एपीएमसी मधील दलाल वर्गाकडून कोकणातील दलालाकडून फसवणूक होते. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या माध्यमातून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हौसिंग सोसायटीज, सेक्टर अशा ठिकाणी ताजे आंबे पाठवते. त्यामुळे दलालांकडे आंबा विक्री करणे कोकणातील शेतकऱ्यांनी टाळायला हवे, असे मोकल म्हणाले.



हवामानाचा आंबा फळावर परिणाम : सणवाराला कोकणातील आंबा बागायतदार दलालांकडून उचल घेतात. त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून स्वस्तात आंबा खरेदी करतात. शेतकऱ्याचे यात फार मोठे नुकसान होत असे. आता मागील पाच सहा वर्षांमध्ये हे प्रमाण कमी झाले आहे. रायगडमध्ये दलाल लोकांकडून पैसे घ्यायचे प्रमाण कमी झाले असले तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अजून काही ठिकाणी ही प्रथा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे ही प्रथा बंद करणे अपेक्षित आहे. दुसरीकडे आंबा हंगामाच्या अगोदरच हापूस मार्केटमध्ये येतो. यंदा फेब्रुवारीमध्ये आंबा बाजारात आला होता. शेतकऱ्यांना नफा होईल, अशी स्थिती असतानाच कोकणाच्या हवामानात एकदम वाढ झाली. किमान 322 अंश असलेले तापमान 38 ते 39 पर्यंत वाढले. याचा वाईट परिणाम आंबा फळावर झाला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये फळगळती झाली, दुसरीकडे मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली. हापूसवर परिणाम होऊन, बहर गळून पडल्याचे चंद्रकांत मोकल सांगतात.


फलोत्पादन मंत्री यांना निवेदन : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सत्रात राज्याचे कृषिमंत्री आणि फलोत्पादन मंत्री यांना निवेदन दिले. दुर्दैवाने अजून त्याच्यावर कोणती कार्यवाही झालेली नाही. सध्या दहा ते पंधरा टक्केच उत्पादन शेतकऱ्याकडे आहे. त्यामुळे शासनाचे पूर्वीचे निकष पकडून शेतकऱ्याला कमीतकमी हेक्टरी दीड लाख रुपये अनुदान मिळावे, अशी आमची मागणी आहे. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. राज्य सरकारला पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप शासन निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही. राज्य सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना 2014 च्या धर्तीवर नुकसान भरपाई द्यावी, अशी कोकणातील आंबा उत्पादकांची मागणी असल्याचे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले. राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नसल्याने त्यांनी खंतही व्यक्त केली.

हेही वाचा: Hapus Mango आंबा खरेदी करताना काळजी घ्या मानांकित प्रमाणपत्र तपासूनच खरेदी करा आंबा

Last Updated :Apr 13, 2023, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.