महाराष्ट्र

maharashtra

Attack on Tahsildar : रस्त्याचा वाद सोडवायला गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला; महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 7:08 AM IST

Updated : Aug 31, 2023, 1:50 PM IST

नागरिकांच्या रस्त्याचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना गावगुंडांनी मारहाण केली. ही घटना नेवासा फाटा इथं बुधवारी घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Crime
तहसीलदारांवर हल्ला

रस्त्याचा वाद सोडवायला गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला

अहमदनगर :नागरिकांचा अडवलेला रस्ता मोकळा करुन देण्यास गेलेल्या तहसीलदारावर हल्ला करुन त्यांना मारहाण केल्यानं खळबळ उडाली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा इथं बुधवारी घडली. संजय बिरादार असं मारहाण करण्यात आलेल्या तहसीलदारांचं नाव आहे. तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण केल्याप्रकरणी सत्यजित घुले, करणसिंह घुले असं आरोपींचं नाव असून त्यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा फाट्यावरील तारा पार्क परिसरातील घटना :नेवासा फाट्यावरील तारा पार्क परिसरातील रहिवाशांच्या रस्त्याचा वाद सुरू आहे. सत्यजित घुले, करणसिंह घुले यांनी या नागरिकांचा रस्ता बंद केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. सदरचा रस्ता आपल्या मालकीचा असून खासगी जागेतून बेकायदेशीरपणानं तो काढला गेल्याचा घुले कुटुंबाचा दावा आहे. याबाबत वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार संजय बिरादार हे गेले होते.

तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण :नेवासा येथील तहसीलदार संजय बिरादार हे रस्ताच्या वाद सोडवण्यासाठी पोलिसांच्या फौजफाट्यांसह घटनास्थळावर गेले होते. यावेळी दोन गटात वाद झाल्यानंतर करण घुले आणि सत्यजित घुले यांनी तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण केली. त्यानंतर खाली पाडून गळा दाबत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं तहसीलदार संजय बिराजदार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. त्यांच्या तक्रारीनुसार घुले कुटुंबातील तीन जणांवर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस बंदोबस्त असतानाही मारहाण :तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर घुले कुटुंबातील तीन जणांनी हल्ला चढवून मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी पाहिलं आहे. घटनास्थळावरील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये मारहाणीची ही घटना कैद केली आहे. तहसीलदार संजय बिरादार यांना घुले कुटुंबातील तीन जणांनी मारहाण केल्यानं येथील रहिवाशांनी या घटनेचा निषेध केला आहे. रहिवाशांना देखील घुले कुटुंबीयांचा त्रास असल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र तरीही तहसीलदार पदावरील जबाबदार महसूल अधिकाऱ्यावर हल्ला झाल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. आरटीओ अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी 15 शेतकऱ्यांवर गुन्हे; अपघाताची खरी माहिती गुलदस्त्यातच
  2. माजी नौदल अधिकारी मारहाण : जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक
Last Updated : Aug 31, 2023, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details