महाराष्ट्र

maharashtra

मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

By

Published : Sep 16, 2021, 6:17 PM IST

Updated : Sep 16, 2021, 8:10 PM IST

virat-kohli-will-step-down-as-t20-captain-after-t20-world-cup
मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

विराट कोहलीने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द विराट कोहलीने याची माहिती दिली.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खुद्द विराट कोहलीने याची माहिती दिली. विराट कोहलीने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल भावूक होऊन सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

विराट कोहलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक सविस्तर पत्र पोस्ट केले आहे. यात विराटने सुरूवातीलाच सर्वांचे आभार मानले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून केलेल्या या वाटचालीत मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार, असे त्याने म्हटलं आहे.

विराट कोहलीने त्याच्या पत्रात काय म्हटलं आहे

विराट कोहलीने त्याच्या पत्रात म्हटलं आहे की, मला फक्त भारतीय संघात खेळण्याचीच नाही तर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि आमच्या विजयासाठी प्रार्थना करणारा प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय मी हे करू शकलो नसतो.

स्वत:वर असणारा ताण समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी तिन्ही प्रकारात भारतीय संघाने कर्णधारपद सांभाळत आहे. पण आता वाटू लागले आहे की, स्वत:ला वेळ द्यायला हवा. जेणेकरून एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार राहीन. टी-20 संघाचा कर्णधार म्हणून मी शक्य ते सगळे दिले आहे. एक फलंदाज म्हणून यापुढेही मी ते करत राहणार आहे, असे देखील विराट कोहलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून घेतला आहे. त्याने या संदर्भात म्हटलं की, कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ घेतला. मी माझ्या जवळच्या व्यक्ती, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी या निर्णयावर आलो की, आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेंनंतर मी भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. या निर्णयाबद्दल मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्यासह निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे.

दरम्यान, विराटच्या नेतृत्वात भारताने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 चा 50 षटकाचा विश्वकरंडक आणि 2021 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. पण दुर्दैवाने या तीनही स्पर्धांमध्ये भारताला ट्रॉफी जिंकता आली नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत 65 कसोटी सामने खेळले. यात भारताने सर्वाधिक 38 विजय मिळवले. तर 16 सामन्यात भारताचा पराभव झाला. राहिलेले 11 सामने अनिर्णीत राहिले आहेत. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 95 सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळली. यात भारताने 65 विजय मिळवले. तर 27 सामन्यात भारताचा पराभव झाला. तर टी-20 मध्ये 45 सामन्यांत 27 विजय व 14 पराभव झाले आहेत.

हेही वाचा -IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी धावा करताना चाचपडतोय; गौतम गंभीरने दिली मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा -भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा 2021 ऐवजी 2022 मध्ये होणार

Last Updated :Sep 16, 2021, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details