महाराष्ट्र

maharashtra

Ind vs Eng : भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

By

Published : Sep 6, 2021, 9:38 PM IST

Updated : Sep 6, 2021, 10:12 PM IST

India beat England by 157 runs to go 2-1 up in 5-Test series
Ind vs Eng : भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी ()

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. दरम्यान, ओवलच्या मैदानावर 1971 नंतर भारताचा हा पहिलाच विजय आहे.

ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या मलिकेमधील चौथा सामना केनिंग्टन ओवलच्या मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 210 धावांत आटोपला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला. ऐतिहासिक विजयात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

इंग्लंडची मधली फळी कोळमडली -

एकवेळ इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. इंग्लंडचा संघ हा सामना सहज ड्रॉ करणार असे वाटत होते. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर लोटांगण घातले. इंग्लंडचे 52 धावांत एकपाठोपाठ 6 गडी बाद झाले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि दमदार विजय मिळवला.

पाचव्या दिवशी भारताला पहिले यश शार्दुल ठाकूरने मिळवून दिले. त्याने रोरी बर्न्सला (50) पंत करवी झेलबाद केले. पहिल्या गड्यासाठी रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी 100 धावांची भागिदारी रचली. बर्न्स बाद झाल्यानंतर आलेला डेविड मलान धावबाद झाला. त्याला सब्स्टिट्यूट फील्डर मयांक अग्रवाल याने माघारी धाडलं.

इंग्लंडच्या डावाला गळती

उपहारानंतर रविंद्र जडेजाने हसीब हमीद याची शिकार केली. त्याने 63 धावांची खेळी केली. यानंतर इंग्लंडच्या डावाला गळती लागली. ओली पोप (2), जॉनी बेयरस्टो (0), मोईन अली (0), जो रूट (36), ख्रिस वोक्स (18), क्रेग ओवरटन (10) ठराविक अंतराने बाद झाले. अखेरीस उमेश यादवने जेम्स अँडरसनला ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा पहिला डाव 290 धावांवर आटोपला. भारतीय संघ पहिल्या डावात 99 धावांच्या पिछाडीवर होता. परंतु भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले. यात रोहित शर्माने 14 चौकार आणि 1 षटकारासह झंझावती 127 धावांची खेळी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा (61), शार्दुल ठाकूर (60), ऋषभ पंत (50), के एल राहुल (46), विराट कोहली (44), उमेश यादव (25) आणि जसप्रीत बुमराह याने 24 धावांचे योगदान दिले.

ओवलवर भारताचा 50 वर्षांनंतर विजय

भारतीय संघाला ओवलच्या मैदानावर मागील 50 वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता. भारतीय संघाने हा 50 वर्षांचा दुष्काळ संपवला. 1971 नंतर ओवलवर भारताचा हा पहिलाच विजय ठरला.

हेही वाचा -टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा

हेही वाचा -Ind vs Eng: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, मोडला कपिल देवचा हा विक्रम

Last Updated :Sep 6, 2021, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details