महाराष्ट्र

maharashtra

युद्ध थांबवण्यासाठी अहमद मसूद यांचे तालिबानला चर्चेसाठी आवाहन

By

Published : Sep 6, 2021, 10:18 AM IST

अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने आपला मोर्चा पंजशीर खोऱ्याकडे वळवला आहे. तालिबानकडून पंजशीरमध्ये सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यावर तालिबानचा वाढता प्रभाव पाहता पंजशीरमधील प्रमुख नेता अहमद मसूदने तालिबानला संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले असून शांतता चर्चेसाठी आपले दरवाजे खुले असल्याचं म्हटलं. तर यावर तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Panjshir
अहमद मसूद

काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जेनंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान दररोज अफगाणिस्तानचे नवीन प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने आता पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर तालिबानचा वाढता प्रभाव पाहता अहमद मसूदने तालिबानला पंजशीरमधील संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले असून शांतता चर्चेसाठी आपले दरवाजे खुले असल्याचं म्हटलं. तालिबानने हल्ले थांबवले तर आम्ही लढाई रोखण्यास तयार आहोत, असे अहमद मसूद यांनी म्हटलं आहे. तर यावर तालिबानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स आणि तालिबानी समोरासमोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालिबान्यांकडून सातत्याने पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंजशीर काबीज केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तर नॉर्दर्न अलायन्सने तालिबानचा दावा फेटाळला आहे. गेल्या दिवसात तालिबानकडून पंजशीरमध्ये हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (NRF) ने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात तालिबानकडे युद्धबंदीचे आणि चर्चेतून समस्या सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पंजशीरवर लादलेले निर्बंध हटवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे आवाहन तालिबानला करण्यात आले आहे.

ताज्या माहितीनुसार, तालिबान विरूद्धच्या लढ्यात नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानला मोठा झटका बसला आहे. या हल्ल्यात रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते फहीम दश्ती ठार झाले. या हल्ल्यात जनरल अब्दुल वुदूद जारा यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. फहीम दश्ती यांचा मृत्यू नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानसाठी मोठा धक्का आहे. कारण, ते अहमद मसूदच्या खूप जवळचे होते. अहमद मसूद आणि त्याचे वडील अहमद शाह मसूद यांच्या अत्यंत घनिष्ट नाते होते. 26/11 च्या दोन दिवसांनी अहमद शाह मसूद यांच्यावर हल्ला झाला. तेव्हा फहीम दश्ती त्यांच्यासोबत होते. फहीम दश्ती आणि अब्दुल वुदूद यांच्या मृत्यूनंतर आणखी नुकसान नको, या दृष्ट्रीकोनातून अहमद मसूद यांनी वाटाघाटीसाठी पुढाकार घेतल्याचे म्हटलं जात आहे.

तालिबान सरकारची घोषणा लवकरच -

अफगाणिस्तानात लवकरच तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा करण्यात येणार आहे. मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा हे देशाचे सर्वोच्च नेता होऊ शकतात. पंतप्रधानपदी अब्दुल गनी बरादर किंवा मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूबची निवड होऊ शकते.मुल्‍ला अखुंदजादा हे एक रहस्यमय व्यक्ती असून त्यांना अनेक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले नाही. 60 वर्षीय मुल्ला हे तालिबान सरकारचे सर्वोच्च नेता होणार आहेत. तालिबान इराण मॉडेलनुसार सरकार स्थापन करणार आहे. अफगाणिस्तानात सत्ता मिळवली असली तरी तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे.

हेही वाचा -Lion of Panjshir : 'मुकाबला, पण शरण नाही'; तालिबानविरोधात पाय रोवून अहमद मसूद अन् त्यांची 'नॉर्दर्न अलायन्स'

हेही वाचा -अफगाणिस्तानमधील अभेद्य 'पंजशीर प्रांत'; येथे पायही नाही ठेवू शकला तालिबान

ABOUT THE AUTHOR

...view details