महाराष्ट्र

maharashtra

आईला धमकावल्याच्या रागातून भररस्त्यात सराईत गुंडाची निर्घृण हत्या; पाच आरोपींना अटक

By

Published : Sep 18, 2021, 1:56 AM IST

ठाण्यात शुक्रवारी सकाळी मुख्य आरोपी आकाश शिंदे उर्फ चिंट्या ह्याच्या आईला त्याच्या घरी जाऊन पूर्व वैमनस्यातून मयत सुशांत गायकवाड याने धमकी दिली होती. याबाबतचा अदखलपात्र गुन्हा हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकाशच्या आईने दाखल केला होता. आईला धमकावल्याचा रागातून चिंट्याने सुशांतची हत्या केली असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे आणि पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.

brutal murder of a goon out of anger over threatening his mother in thane; 5 accused arrested
आईला धमकावल्याच्या रागातून भररस्त्यात सराईत गुंडाची निर्घृण हत्या; पाच आरोपींना अटक

ठाणे - घरी येऊन आईला धमकी दिल्याच्या रागातून एका सराईत गुंडाची त्याच्याच ५ मित्रांनी दिवसाढवळ्या भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहदारीच्या रस्त्यावर घडली आहे. तर विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत हत्येप्रकरणी पाच आरोपींना गजाआड केले आहे. आकाश शिंदे उर्फ चिंट्या, अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते, अवि थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सर्व आरोपी सराईत गुंड असल्याचे समोर आले आहे. तर सुशांत उर्फ गुड्या गायकवाड असे हत्या झालेल्या सराईत गुंडाचे नाव आहे, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले.

अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची प्रतिक्रिया

पाच जणांनी धारदार शस्त्रांनी केला हल्ला -

मृतक सुशांत उर्फ गुड्या गायकवाड हा पूर्वी उल्हासनगरमधील सुभाष टेकडी परिसरात राहत होता. या परिसरात त्याची दहशत होती. त्यानंतर तो माणेरे गाव येथे राहण्यास गेला. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत गुड्या हा न्यु इंग्लिश शाळेजवळ दोन मित्रांसोबत चहा पीत उभा होता. त्यावेळी त्याच्या मागावर असलेल्या पाच जणांच्या टोळक्याशी त्याचा वाद झाला. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो बंगलो भागातील रोडवरून जीव वाचविण्यासाठी पळाला. मात्र पाच जणांच्या टोळीने त्याच्यावर धारदार शस्रांनी हल्ला केला आणि शस्त्र तिथेच टाकून पळ काढला. पंधरा ते वीस मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुड्याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापती असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले.

दोन तासातच ५ आरोपींना अटक -

पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे, हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तोपर्यंत विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांची पथके रवाना झाली होती. विठ्ठलवाडी पोलिसांनी आकाश शिंदे उर्फ चिंट्या, अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते या आरोपींना तर हिललाईन पोलिसांनी अवि थोरात या आरोपीला अटक केली, असे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी सांगितले.

पूर्व वैमनस्यातून मित्राने काढला काटा -

शुक्रवारी सकाळी मुख्य आरोपी आकाश शिंदे उर्फ चिंट्या याच्या आईला त्याच्या घरी जाऊन पूर्व वैमनस्यातून मयत सुशांत गायकवाड याने धमकी दिली होती. याबाबतचा अदखलपात्र गुन्हा हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकाशच्या आईने दाखल केला होता. आईला धमकावल्याचा रागातून चिंट्याने सुशांतची हत्या केली असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे आणि पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.

मृत व मुख्य आरोपी दोघेही सराईत गुंड -

मृत सुशांत गायकवाड आणि चिंट्या शिंदे हे दोघेही एका टोळीत कार्यरत होते. ह्या दोघांनी मिळून केलेले तीन गुन्हे परिमंडळ चारमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच मृत सुशांत गायकवाडवर नऊ तर मुख्य आरोपी चिंट्या शिंदेवर सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी दिली.

हेही वाचा -कल्याणमध्ये दारूसाठी मित्राची हत्या; दोन आरोपींना पोलिसांनी केले अटक

ABOUT THE AUTHOR

...view details