महाराष्ट्र

maharashtra

यंदा नवरात्रीचा सण आठ दिवसांचा; पंचागकर्त्यांनी 'हे' सांगितले कारण

By

Published : Oct 7, 2021, 1:05 AM IST

Updated : Oct 7, 2021, 1:49 AM IST

शारदीय नवरात्र 1967, 2011, 2012 या साली आठ दिवसांचे होते. यंदाच्या 2021साली देखील नवरात्र उत्सव आठ दिवसांचे आहे. 2038 साली देखील आठ दिवसांचे नवरात्र उत्सव असेल, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.

नवरात्र सण
नवरात्र सण

सोलापूर- शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. देवीची विशेष आराधना या नवरात्र उत्सवात केली जाते. तिथीचा क्षय झाल्याने यंदाच्या वर्षीचा नवरात्र उत्सव आठ दिवसांचा असल्याचे पंचागकर्ते सांगत आहे.

गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) नवरात्र उत्सव सुरू होत आहे. गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत देवीची पूजा करून घटस्थापना करा, असा संदेश पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिला आहे. पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले, की शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की शरद ऋतूच्या प्रारंभी येते. दुर्गोउत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून व नंदादीप प्रजवलीत करून आदीमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच नवरात्रोत्सव किंवा घटस्थापना होय.

यंदा नवरात्रीचा सण आठ दिवसांचा



हेही वाचा-तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव यंदाही भक्तांविनाच; भाविकांना प्रवेश बंदी


नवरात्रोत्सवाची पौराणिक कथा
देवीने नवरात्री नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला होता. देवीने महिषासुराचा वध केला होता. म्हणून या देवीचे नाव महिषासुरमर्दिनी असे रूढ झाले. तेव्हापासून पृथ्वीवर महिषासुरमर्दिनीच्या शक्तीरूपाची पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार व खडग ही शस्त्रे धारण केलेली आकर्षक अशी देवीची मूर्ती सगळीकडे पुजली जाते.

हेही वाचा-यंदाही चैत्र नवरात्र भविकांविनाच साजरी होणार

यंदाचा नवरात्रोत्सव आठ दिवसांचा-
पंचागकर्ते दाते यांच्या माहितीनुसार नवरात्र उत्सव कधी कधी 8 ते 10 दिवसांचा साजरा केला जातो. नवरात्र साधारणपणे नऊ दिवसांचे असते. पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असू शकते. यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव आठ दिवसांचे आले असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे. शारदीय नवरात्र 1967, 2011, 2012 या साली आठ दिवसांचे होते. यंदाच्या 2021साली देखील नवरात्र उत्सव आठ दिवसांचे आहे. 2038 साली देखील आठ दिवसांचे नवरात्र उत्सव असेल. 2000 व 2006 साली नवरात्र दहा दिवसांचे होते.

हेही वाचा-पंडित गाळगीळ यांनी सांगितले घटस्थापनेचे महत्व, पाहा व्हिडिओ...

ही आहेत देवीची रूपे-
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया आणि जगदंबा म्हणून गौरविले. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रुपांची नावे आहेत. तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रुपे आहेत. शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मानडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत.

नवरात्रोत्सव आणि व्रत-
नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदीशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. घरातील पवित्र ठिकाणी घटस्थापना करून घटाची व देवीची पूजा करतात. व्रतधारी व्यक्ती नऊ दिवस उपवास करून व्रतस्थ रहावयाचे असते. अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.

विजयादशमी म्हणजेच दसरा-
अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी वध केला अशी कथा आहे. दसरा या सणाला पौराणिक व ऐतिहासिक असे महत्व आहे. त्यामुळे या सणाला नवरात्रच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त समजले जाते. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा, शस्त्रपूजा ही चार कृत्ये केली जातात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.

Last Updated :Oct 7, 2021, 1:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details