महाराष्ट्र

maharashtra

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापन करणार - प्रफुल्ल पटेल

By

Published : Sep 3, 2021, 7:30 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दक्षिण गोव्यात चांगलाच प्रभाव आहे, सध्या या पक्षाची धुरा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या प्रसिद्ध अशा चर्चिल ब्रदर्स या फुटबॉल संघाला सत्ताधारी भाजपकडून सधळ हस्ते मदत केली जाते. त्यामुळे राज्य नेतृत्व नेहमीच भाजपच्या बाजूने आहे. राजकीय मुद्दा असो किंवा विधानसभा अधिवेशनात चर्चिल आलेमाव नेहमीच शांत असल्याचे दिसून येते.

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल

पणजी - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पटेल यांनी राज्यातील प्रादेशिक पक्षांशी चर्चा करून आगामी निवडणूक एकत्र लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तशी सकारात्मक चर्चाही त्यांनी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापन करणार

भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करून आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने घेतला आहे. मागच्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी होता त्यामुळे केंद्रात व राज्यात नैसर्गिक मित्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला युतीत सहभागी करून घेण्यास काँग्रेस पक्ष इच्छुक आहे.

2017 ची पुनरावृत्ती नको-

2017 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने एकत्र येऊन बहुमताच्या जोरावर सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या गाफीलपणाचा फायदा घेऊन भाजपाने अन्य पक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन केली होती. म्हणून त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होऊ नये म्हणूनच आम्ही एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून निवडणुका लढविणार असून त्यासंबंधीची सकारात्मक चर्चा अन्य दोन्ही पक्षांशी झाल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

राज्यातील नेतृत्व मात्र भाजपसोबत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दक्षिण गोव्यात चांगलाच प्रभाव आहे, सध्या या पक्षाची धुरा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या प्रसिद्ध अशा चर्चिल ब्रदर्स या फुटबॉल संघाला सत्ताधारी भाजपकडून सधळ हस्ते मदत केली जाते. त्यामुळे राज्य नेतृत्व नेहमीच भाजपच्या बाजूने आहे. राजकीय मुद्दा असो किंवा विधानसभा अधिवेशनात चर्चिल आलेमाव नेहमीच शांत असल्याचे दिसून येते.

म्हणून आलेमाव यांचा भाजपाला पाठिंबा

चर्चिल आलेमाव नेहमीच भाजपच्या गोटात वावरताना दिसतात. यासंदर्भात प्रफुल पटेल यांना विचारले असता, ते म्हणाले राज्यात किंवा मतदारसंघात कामे करायची असतील तर सत्ताधारी पक्षांशी जुळवून घ्यावे लागते, आणि तेच काम आलेमाव करतात त्यात वेगळे असे काही नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details