महाराष्ट्र

maharashtra

वैफल्यग्रस्त झाल्यानेच चंद्रकांत पाटलांकडून सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार

By

Published : Jul 2, 2021, 10:26 AM IST

पोलीस दलात असताना ज्या पोलीस अधिकाऱ्याने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण खराब केले, अशा व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा का? हा खरा प्रश्न असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त झाल्याने चौकशीची मागणी करत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार
सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार

नाशिक- भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव झाला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातील पत्र देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवले. भाजपाच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. पोलीस दलात असताना ज्या पोलीस अधिकाऱ्याने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण खराब केले, अशा व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा का? हा खरा प्रश्न असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील वैफल्यग्रस्त झाल्याने चौकशीची मागणी करत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. गुरुवारी जिल्हानियोजन भवनात कोरोना व खरीप आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटलांकडून सीबीआय चौकशीची मागणी- अजित पवार

चंद्रकांत पाटलांची लोकप्रतिनिधीने तक्रार करुनही चौकशी झाली नाही-

चंद्रकांत पाटील महसूल व बांधकाम मंत्री असताना त्यांच्यावर सेनेच्या आमदाराने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एका लोकप्रतिनिधीने तक्रार करुनही चौकशी झाली नाही. मग तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन पुरावे नसताना पक्षाच्या बैठकीत चौकशीचा झालेला ठराव पहिल्यांदाच पाहतोय, असा टोला पवार यांनी पाटलांना लगावला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्ल्याबाबत विचारले असता, घटनेने प्रत्येकाला मत स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ज्यांनी हल्ला केला त्याच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. पंरतु, वक्तव्य करताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, याचे भान ठेवावे. काहीजण ब्रेकिंग न्यूजसाठी गरळ ओकत असतात. बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मत देऊ नका, असे विधान करणार्‍यांना बारामतीकरांनी चांगला धडा शिकवला आहे, त्याचे डिपाॅझिट जप्त केले, असा टोला पवारांनी पडळकरांचे नाव न घेता हाणला आहे.

हे सरकार पाच वर्ष टिकेल-

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षश्रेष्ठींनी हे सरकार पाच वर्ष टिकेल हे सांगितले आहे. दीड वर्ष सरकारचे पूर्ण झाले असून हे सरकार पाच वर्ष चालेल. मात्र, काहीजण अफवा पसरविण्याचे उद्योग करत असतात, असे टिकास्त्र त्यांनी भाजपवर सोडले आहे.

नवीन कृषी कायदा आणणार-

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचा अपमान केला असून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. न्यायालयाने कृषी बिलाला स्थगिती दिली आहे. पंजाब, राजस्थान व छत्तीसगड या बिगर भाजप राज्यांनी नवीन कृषी कायदे आणण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्र सरकारही नवीन कृषी कायद्याबाबत अभ्यास करत आहे. केंद्राचा कायदा बंधनकारक असला तरी शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.

बोगस डॉक्टरांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी-

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करता संभाव्य तिसऱ्या लाटेत 30 वर्षाच्या आतील वयोगटातील नागरिक, तसेच बालके बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादृष्टिने प्रत्येक तालुकास्तरावर बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details