महाराष्ट्र

maharashtra

'RSS आणि तालिबान एकसारखेच'; संगीतकार जावेद अख्तर यांच्या वक्तव्याविरोधात याचिका दाखल

By

Published : Oct 23, 2021, 10:25 AM IST

संगीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकसारखे असल्याचे वक्तव्य एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. जावेद अख्तर यांनी आरएसएसची तालिबानशी केलेली तुलना अत्यंत अपमानास्पद असल्याचे वकिल संतोष दुबे यांनी म्हटले आहे.

संगीतकार जावेद अख्तर
संगीतकार जावेद अख्तर

मुंबई -संगीतकार जावेद अख्तर सध्या RSS संदर्भात केलेल्या विधानावरुन चर्चेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी केलेली तुलना जावेद अख्तर यांना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी खासगी वकिल संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली आहे. मुलंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणाची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आरएसएसची तुलना तालिबानसोबत -

संगीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकसारखे असल्याचे वक्तव्य एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. जावेद अख्तर यांनी आरएसएसची तालिबानशी केलेली तुलना अत्यंत अपमानास्पद असल्याचे वकिल संतोष दुबे यांनी म्हटले आहे. पुढे वकिल दुबे यांनी म्हटले आहे की, आरएसएस आणि तालिबान हे कोणत्या विचारधारेवर काम करतात आणि त्यांच्या विचारधारेत किती तफावत आहे हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मात्र तरीही आरएसएसच्या असलेल्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून अपमानास्पद आणि खोटे वक्तव्य केले आहे. १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत याचिका दाखल करणाऱ्या वकिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत.

याआधीही गुन्हा दाखल -

याआधी देखील वकिल संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये कलम ५०० अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मात्र ही तक्रार पोलिसांकडून अज्ञात गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे मागील महिन्यात वकिल संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवून या प्रकरणी माफी मागण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे RSS कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी देखील जावेद अख्तर यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात न्यायालयीन खटला दाखल केला होता. जावेद अख्तर यांनी खाजगी टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यांनी म्हटले होते की, तालिबान अफगाणिस्तानला इस्लामी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूस्तानला हिंदू राष्ट्र बनवण्याचे काम करत असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details