महाराष्ट्र

maharashtra

Param Bir Singh : फरार घोषीत केलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत परतले

By

Published : Nov 25, 2021, 11:15 AM IST

Updated : Nov 25, 2021, 3:04 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir Singh) मुंबईत दाखल झाले आहेत. चौकशीला हजर राहण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती आहे.

Param Bir Singh
परमबीर सिंग

मुंबई -मुंबईसह विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग ( Param bir Singh ) आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत. आपल्याला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. तसेच जे काही बोलेल ते न्यायालयात बोलेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, सुमारे तीन तासांपासून त्यांची कांदिवली कार्यालयात चौकशी सुरु आहे. डीसीपी दर्जाचे एक अधिकारी त्यांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयासमोरील व्हिडिओ

सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण मिळताच परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत येऊन तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानुसार ते आज मुंबईत चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex home Minister Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर ईडीने तपास करून अनिल देशमुख यांना अटक केली होती. आरोप केल्यानंतर आपल्याकडे या संदर्भातली पुरावे नाहीत, असे सांगत परमबीर सिंग यांनी देशाबाहेर पलायन केल्याची चर्चा होती. यानंतर त्यांना न्यायालयाने फरार घोषीत केले होते. मात्र, न्यायालयात सुनावणीदरम्यान परमबीर सिंग देशातच असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले होते. परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले.

यावर गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिलं असून तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. 48 तासांमध्ये सीबीआयसमोर हजर राहण्यास त्यांना सांगितले होते. आज ते मुंबईत दाखल झाले आहेत.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. तर, दुसरीकडे श्यामसुंदर अग्रवाल यांनी सिंग यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोप करत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या आरोपांप्रकरणी आतापर्यंत 4 पोलीस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप -

परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण ( Shamsher Pathan ) यांनी परमबीर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील ( 26/11 Terrorist Attacks ) दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप परमबीर यांच्यावर शमशेर पठाण यांनी केला. शमशेर पठाण हे मुंबईचे निवृत्त पोलीस एसीपी आहेत. त्यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहिलं होतं. या गंभीर आरोपामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Nawab Malik : नवाब मलिक यांचे उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल

Last Updated : Nov 25, 2021, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details