महाराष्ट्र

maharashtra

पडळकर, खोत कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडत असावे; अनिल परब यांचा चिमटा

By

Published : Nov 16, 2021, 6:49 PM IST

ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व भाजप नेते गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत हे करत आहेत. हे दोघे दोन वेळा चर्चा करण्यासाठी आले. परंतु एकदा गेल्यावर ते पुन्हा फिरकतच नाही. कदाचित दोघेही कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडत असावेत, असा चिमटा परिवहन मंत्री अनिल परब यांनी काढला.

पडळकर, खोत कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडत असावे; अनिल परब यांचा चिमटा
पडळकर, खोत कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडत असावे; अनिल परब यांचा चिमटा

मुंबई : ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व भाजप नेते गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत हे करत आहेत. हे दोघे दोन वेळा चर्चा करण्यासाठी आले. परंतु एकदा गेल्यावर ते पुन्हा फिरकतच नाही. कदाचित दोघेही कर्मचाऱ्यांना समजावण्यात कमी पडत असावेत, असा चिमटा परिवहन मंत्री अनिल परब यांनी काढला. तसेच उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची पहिली बैठक आज होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देणार असल्याचे परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
राज्यात २६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. ऐन दिवाळीतच संप पुकारल्याने राज्य शासनाची धावपळ उडाली. विलीनीकरणाच्या मागणी व्यतिरिक्त सर्व मागण्या मान्य केल्या. परंतु, विलीनीकरणावर कर्मचारी अडून राहिल्याने राज्य महामंडळाने कारवाईला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी त्यानंतर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्रिसदस्य समिती नेमून १२ आठवड्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची पहिली बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे समिती समोर मांडावे. चर्चेतून प्रश्न सुटेल. राज्य शासन ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नका. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन मंत्री अनिल परब यांनी केले.

आम्ही तुमचे वैरी नाही
महामंडळाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर संपात उभी फूट पडली. अनेक कर्मचारी सेवेत रुजू झाले. रोजंदारीवर काम करणारे सुमारे हजार ते दीड हजार कर्मचारी संपात सहभागी आहे. सर्वांना नोटीस बजावली आहे. आतापर्यंत २८ संघटनांसोबत चर्चा केली आहे. कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सोबत बोललो आहे. सध्या भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीनाथ पडळकर संपाचे नेतृत्व करत आहेत. दोघांशी दोन वेळा सविस्तर चर्चा केली. विलीनीकरणाचा निर्णय तात्काळ होणार नाही, असेही सांगितले. दोघेही कर्मचाऱ्यांशी बोलून निर्णय घेतो, असे सांगून गेले आहेत. चर्चा करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. मात्र, पडळकर आणि खोत गेल्यापासून पुन्हा फिरकलेले नाहीत. दोघेही कर्मचाऱ्यांना समजून सांगण्यास कमी पडत असावेत, असा टोला परब यांनी लगावला. संपामुळे खासगी वाहतूक सुरु आहे. एस टी बंद झाल्यास बंद होणे परवडणार नाही. त्यामुळे कर्मचाऱी संघटनांनी विलिनीकरणाची मागणी तुर्तास बाजूला ठेवून इतर मागण्यांवर चर्चा करु या, असे आवाहन परब यांनी केले. आम्ही तुमचे वैरी नाहीत, असेही परब म्हणाले. आता बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details