महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Updates : ४ ते ५ दिवसात रुग्ण बरे होत असल्याने मुंबईकरांना दिलासा; मात्र रूग्णवाढ सुरूच

By

Published : Jan 6, 2022, 6:55 AM IST

रुग्णसंख्या वाढत असली तरी कमी संख्येने रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच चार ते पाच दिवसात रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला जात आहे. गेल्या महिनाभरात मृत्यूही कमी होत असल्याने मुंबईकरांनी कोरोनाची भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करून प्रसार रोखण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Corona Updates
Mumbai Corona Updates

मुंबई- मुंबईत गेल्या महिनाभरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. मुंबईमधील रोज आढळून येणारी रुग्णसंख्या १० हजारच्या पार (Mumbai Corona Updates ) गेली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी कमी संख्येने रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच चार ते पाच दिवसात रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला जात आहे. गेल्या महिनाभरात मृत्यूही कमी होत असल्याने मुंबईकरांनी कोरोनाची भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करून प्रसार रोखण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रुग्णालयातील बेड्स रिक्त -

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. पहिल्या लाटेत २८०० तर दुसऱ्या लाटेत ११ हजारावर सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली होती. डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ४ जानेवारीला १० हजार ८०० रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या येत्या दिवसात आणखी वाढणार आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यापैकी ४ ते ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यापैकी १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. जे रुग्ण रुग्णालयात दाखल केले जात आहेत त्यांच्या चाचण्या ४ ते ५ दिवसात निगेटिव्ह येत असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयातील बेड्स रिक्त आहेत. यामुळे रुग्णसंख्या आणखी वाढली तरी बेड्सची कमतरता भासणार नाही अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

८३ टक्के बेड्स रिक्त -

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पालिकेने आपली व खासगी रुग्णालयांमध्ये ३० हजार बेड्स सज्ज ठेवले आहेत. मुंबईमध्ये रुग्णसंख्या १० हजारांवर गेली असली तरी कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याने १७ ते १८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८३ टक्के बेड्स रिक्त आहेत. रुग्णालयातील बेड्स कमी पडल्यास जंबो कोविड सेंटरमधील बेड्स वाढवण्यात येतील असे काकाणी यांनी सांगितले.

१ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज -

मुंबईमध्ये दररोज कोरोनाचे १० हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी ४ ते ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. पालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन साठा असून लागणाऱ्या ऑक्सिजनच्या तिप्पट साठा करण्याची क्षमता असल्याचे काकाणी यांनी संगितले.

८ लाख १८ हजार ४६२ रुग्णांची नोंद -

मुंबईत ४ जानेवारीला कोरोनाचे १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ मृत्यूची नोंद झाली आहे. ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख १८ हजार ४६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५२ हजार १२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४७ हजार ४७६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ११० दिवस इतका आहे. मुंबईमधील ३८९ इमारती आणि १६ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details