महाराष्ट्र

maharashtra

महापरिनिर्वाण दिन : सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना शासकीय सलामी

By

Published : Dec 5, 2020, 8:00 PM IST

चैत्यभूमी मुंबई

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय सलामी दिली जाणार.

मुंबई - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी शासकीय सलामी दिली जाते. उद्या सकाळी ८ वाजता शासकीय सलामी दिली जाणार आहे. त्यासाठी दादर चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दूरदर्शन व सरकारी यंत्रणांकडून लाइव्ह दाखवला जाणार असल्याने या कार्यक्रमाला मीडियाला प्रवेश दिला जाणार नाही.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झाले. त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच ठिकाणी चैत्यभूमी हे स्मारक उभारण्यात आले आहे. या चैत्यभूमीला ६ डिसेंबरला लाखो अनुयायी भेट देऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतात. तसेच १४ एप्रिललाही हजारो अनुयायी चैत्यभूमीला येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात.

आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीत प्रवेश दिला जाणार नाही-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार असून त्यांनी कायदा मंत्री हे पद भूषविले होते. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन ६ डिसेंबरला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्य सरकारकडून शासकीय सलामी दिली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीत प्रवेश दिला जाणार नाही. मात्र शासकिय कार्यक्रम होणार असून शासकीय सलामी दिली जाणार आहे.

८.१५ वाजता शासकीय सलामी दिली जाणार-

सकाळी ८ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तर ८.०५ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चैत्यभूमी येथे उपस्थित राहणार आहेत. चैत्यभूमीत अभिवादन केल्यावर ८.१५ वाजता शासकीय सलामी दिली जाणार आहे. ८.३० वाजता राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री अशोक स्तंभ येथील भीम ज्योतीला अभिवादन करतील त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

चैत्यभूमीत मिडीयाला 'नो इंट्री' -

दरवर्षी राज्यपाल, मुख्यमंत्री शासकीय सलामी देताना मीडियाला चैत्यभूमी परिसरात प्रवेश दिला जात होता. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात मीडियाला प्रवेश दिला जाणार नाही. दूरदर्शन व सरकारी यंत्रणेकडून या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. मीडियाला अशोक स्तंभाजवळ व्यवस्था करण्यात आली असून त्यापुढे मीडियाला प्रवेश नसेल, अशी माहिती संबंधितांनी दिली.

हेही वाचा-महापरिनिर्वाण दिन - ‘कोविड–१९’च्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबर 'पॅगोडा' बंद

हेही वाचा-महापरिनिर्वाण दिन : चैत्यभूमीवर गर्दी करू नका, महापौरांचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details