महाराष्ट्र

maharashtra

मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकार्‍यांची अशी आहे वादग्रस्त कारकीर्द

By

Published : Jun 18, 2021, 1:36 PM IST

मुंबईतील गुंडांच्या टोळीयुद्धावर अंकुश बसविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या काही निवडक अधिकार्‍यांनी कारवाईचा फास आवळत अनेक गुंडांना यमसदनी पाठवले होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कारवाईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावर मानवी हक्काची पायमल्ली होत असल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील अनेक पोलिस अधिकारी हे वादात अडकले. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या पैकी एक म्हणजे सध्या चर्चेत असलेले नाव प्रदीप शर्मा...

एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकार्‍यांची अशी आहे वादग्रस्त कारकीर्द
एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकार्‍यांची अशी आहे वादग्रस्त कारकीर्द

मुंबई- जगातील टॉप टेन श्रीमंताच्या यादीतील व्यक्ती असणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर काही अंतरावर स्कॉर्पिओ गाडी जिलेटिन स्फोटकांनी भरलेली आढळून आली होती. त्यानंतर या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात असताना मुंबई पोलीस खात्यातील एकेकाळी नावाजलेले आणि तेवढेच वादात अडकलेल्या दोन एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यात पहिल नाव येते ते सचिन वाझे याचे, तर दुसरे नाव म्हणजे मुंबईत तब्बल 312 गॅंगस्टरचा खात्मा करणारे प्रदीप शर्मा यांचे. मुंबई पोलीस खात्यातले एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी हे नेहमीच वादात अडकले होते. मुंबई पोलीस खात्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत...

90 दशकात मुंबईत वाढले टोळी युद्ध-

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 90 च्या दशकात गॅंगवार हा चांगलाच फोफावला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, अश्विन नाईक, सुरेश मंचेकर, माया डोळस, मन्या सुर्वे या सारख्या गुंडांकडून मुंबईतील उद्योगपती बिल्डर यांना सतत खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या. यातून सुरू झालेल्या टोळीयुद्धावर अंकुश बसविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या काही निवडक अधिकार्‍यांनी कारवाईचा फास आवळत अनेक गुंडांना यमसदनी पाठवले होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कारवाईला प्रसिद्धी मिळाल्यानंतर यावर मानवी हक्काची पायमल्ली होत असल्यामुळे मुंबई पोलीस खात्यातील अनेक पोलिस अधिकारी हे वादात अडकले. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या पैकी एक म्हणजे सध्या चर्चेत असलेले नाव प्रदीप शर्मा...

1) प्रदीप शर्मा

या पोलीस अधिकाऱ्याने तब्बल 312 गुंडांचा एन्काऊंटर केलेला असून यामध्ये लष्करे ए तोयबाच्या काही दहशतवाद्याचा एन्काऊंटरही केला होता. 2008 मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणी या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र 2013मध्ये न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी प्रदीप शर्माला निर्दोष मुक्त केले होते. या अगोदर प्रदीप शर्मा याच्यावर भ्रष्टाचार व गुन्हेगारी विश्वाशी संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र यातील कुठलाही आरोप सिद्ध न झाल्यामुळे 2017 मध्ये या अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. आता प्रदीप शर्मा याला अँटिलिया स्फोटक प्रकरणात एनआयएकडून अटक करण्यात आले आहे.

प्रदिप शर्मा
2) दया नायकपोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सामील झालेल्या दया नायक या पोलीस अधिकाऱ्याने आत्तापर्यंत 83 एन्काऊंटर केले असून या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार व उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यामध्ये यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या अधिकाऱ्याने त्याच्या कर्नाटक मधील गावामध्ये 1 कोटी खर्च करून शाळा बांधली होती. त्याच्या उद्घाटनासाठी बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील अभिनेते अमिताभ बच्चन यांना बोलवण्यात आले होते. त्यानंतर दया नायक याचे नाव वादात येऊन त्यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र या अधिकाऱ्याने न्यायालयीन लढा देत आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध केल्यानंतर त्यास आज पुन्हा मुंबई पोलीस खात्यात सामिल करण्यात आले आहे.
दया नायक
प्रफुल्ल भोसलेमुंबई पोलीस खात्यातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल भोसले या अधिकाऱ्याच्या नावावर 77 एन्काउंटर ची नोंद असून या अधिकाऱ्यावर सुद्धा ख्वाजा युनूस प्रकरणांमध्ये नाव आल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
प्रफुल्ल भोसले
रवींद्रनाथ आंग्रेठाणे पोलीस खात्यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवींद्रनाथ आंग्रे या अधिकाऱ्याने 54 गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या अधिकाऱ्यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
रवींद्रनाथ आंग्रे
सचिन वाझे-मुंबई पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर असताना 2002 घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील मुख्य आरोपी ख्वाजा युनुस याला औरंगाबाद येथे चौकशीसाठी मोटार कारने घेऊन जात असताना ख्वाजा युनूस हा बेपत्ता झाला होता. प्रवासादरम्यान पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर ख्वाजा युनूस हा पळून गेला असल्याचे पोलीस रेकॉर्डवर नोंद करण्यात आले आहे. मात्र एवढ्या वर्षानंतरही ख्वाजा युनूस याचा पत्ता न लागल्यामुळे त्याचा पोलीस कोठडीतच खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणांमध्ये सचिन वाझे या अधिकाऱ्यास तब्बल 17 वर्ष पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. 2020 मध्ये सचिन वाझे यास पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटक ठेवण्याच्या संदर्भात तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून वाझेला अटक करण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्यांच्या नावावर आतापर्यंत 63 एन्काऊंटरची नोंद आहे.
सचिन वाझे
विजय साळसकर-मुंबई शहरावर झालेल्या 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अजमल कसाबचा सामना करत असताना विजय साळसकर या अधिकाऱ्याला वीरमरण आले होते. या अधिकाऱ्याच्या नावावर आतापर्यंत 61 एन्काऊंटरची नोंद करण्यात आलेली आहे.
विजय साळसकर
2010 नंतर मुंबईत एकही एन्काऊंटर नाही-राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार 2002 ते 2008 या दरम्यान देशात 440 संशयास्पद एन्काऊंटर करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये 231, राजस्थानमध्ये 33 ,महाराष्ट्रात 31, दिल्लीत 26 , आंध्रप्रदेशात 22, उत्तराखंडमध्ये 19 एन्काऊंटरच्या घटना घडल्या होत्या. मुंबई 2010 नंतर एकही एन्काऊंटर घडलेला नसून शेवटचा मुंबईतील एन्काऊंटर हा मुंबई पोलिसांनी 2010 मध्ये ऑपेरा हाउस या ठिकाणी अशोक परीहाऱ या पांडव पुत्र गँगच्या गुंडांचा केलेला होता. अशोक परिहार या गुंडावर खून , खुनाचा प्रयत्न, अपहरण , खंडणी साठी धमकी देणे यासारखे तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल होते.

ABOUT THE AUTHOR

...view details