महाराष्ट्र

maharashtra

Nitin Gadkari on Reliance Tender : 'माझ्या 'त्या' निर्णयाने धिरूभाई नाराज झाले, पण सरकारचे 2000 कोटी वाचले'

By

Published : Dec 18, 2021, 8:09 AM IST

Updated : Dec 18, 2021, 12:18 PM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामासाठी रिलायन्सने 3600 कोटी रुपयांचा हवाला दिला होता. त्यामुळे ते टेंडर आम्ही रद्द केले आणि एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ) च्या माध्यमातून तेच काम 1600 कोटी रुपयांत पूर्ण केलं. त्यावेळी एमएसआरडीसीचा संस्थापक अध्यक्ष मी होतो. या कामातून आम्ही 2000 कोटी रुपये वाचवले असे नितीन गडकरी यांनी ( Union Minister Nitin Gadkari on Reliance Tender ) सांगितले.

Nitin Gadkari
नितीन गडकरी

मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग, परिवहन आणि गुंतवणणूक या विषयीच्या कार्यक्रमात बोलत असताना आपला जुना एक १९९५ सालचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, मी राज्यमंत्री असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या कामासाठीचे रिलायन्स कंपनीचे एक टेंडर रद्द केले होते. त्यावेळी धीरुभाई अंबानीही तेथे होते, ते माझ्यावर फार संतापले होते. मात्र मी ते टेंडर रद्द केलं अन् तत्कालीन सरकारचे 2000 कोटी रुपये वाचवले ( Union Minister Nitin Gadkari on Reliance Tender ) होते.

'बोलला आहात ते करून दाखवा'

मुंबईतील आजचं हे संमेलन मला १९९५ सालच्या माझ्या राज्यमंत्री या कारकिर्दीची आठवण करुन देत आहे. त्यावेळी, मी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या कामासाठीचे रिलायन्स कंपनीची निविदा रद्द केली होती. हे करत असताना मी कुणाचाही विचार केला नाही. त्यावेळी, धीरुभाई अंबानी तेथे होते, ते माझ्यावर फार संतापले होते. राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हेही माझ्यामुळे रागावले होते. आपण असं का केलं, हे त्यांनी मला विचारलं होत. त्यावेळी, आपण या योजनेसाठी आणि बांद्रा-वरळी सी लिंकसाठी लोकांकडून पैसे जमवू असे मी म्हटलं. तेव्हा सगळेच माझ्यावर हसले होते. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी मला म्हणाले की आता बोलला आहेत ते करून दाखवा.

वाचवले तब्बल २००० कोटी

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामासाठी रिलायन्सने 3600 कोटी रुपयांचा हवाला दिला होता. त्यामुळे ते टेंडर आम्ही रद्द केले आणि एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ) च्या माध्यमातून तेच काम 1600 कोटी रुपयांत पूर्ण केलं. त्यावेळी एमएसआरडीसीचा संस्थापक अध्यक्ष मी होतो. या कामातून आम्ही 2000 कोटी रुपये वाचवले. राज्य सरकारने या योजनेचे मुद्रीकरण केले त्यावेळी आम्हाला 3000 कोटी रुपये मिळाले. दीड वर्षापूर्वी आम्ही पुन्हा एकदा या कामाचे टेंडर दिले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारला 8000 कोटी रुपये मिळाले असे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा किस्सा

रस्त्यांच्या कामाला येणाऱ्या खर्चाचे आकडे ऐकून त्यावेळी सर्वसामान्य लोकांनाही आश्चर्य वाटायचे. तत्कालीन मुख्यमंत्रीही याला अपवाद नव्हते. यासंदर्भातील एक किस्साही यावेळी बोलताना गडकरी यांनी सांगितला. त्यावेळी म्हणजेच १९९५ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तर गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गडकरी यांनी ५५ फ्लायओव्हरसह इतरही काही योजना मांडल्या होत्या. त्याला पैसा कुठून आणायचा असा विषय होता. तर लोकांच्याकडून पैसे गोळा करुन आपण ही कामे करुन असे गडकरी यांनी सांगितले होते. तर तुम्ही चांगले बोलत आहात, मात्र हे काही होईल असे वाटत नाही, असे मनोहर जोशी म्हणाले होते, असेही गडकरींनी यावेळी सांगितले. मात्र नंतर हे सगळे प्रकल्प व्यवस्थित झाल्याचे गडकरी म्हणाले.

'बाळासाहेब म्हणाले होते रोडकरी'

केंद्रीय नितीन गडकरी हे आपल्या कामासाठी ओळखले जातात. १९९५ साली राज्यात युती सरकारच्या काळात त्यांच्या अधिपत्याखालील खात्याने बनवलेल्या रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची नेहमीच चर्चा होत असते. त्यामुळेच, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही गडकरी यांचे नाव रोडकरी ठेवले होते.

हेही वाचा -PM Goa Visit : गोवा मुक्तीदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर

Last Updated : Dec 18, 2021, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details