महाराष्ट्र

maharashtra

Uddhav Thackeray : मराठीचा द्वेष बरा नव्हे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष वाभाडे काढले

By

Published : Feb 28, 2022, 7:47 AM IST

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray on Marathi language ), उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध पुरस्कारांचे वितर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष वाभाडे काढले.

मुख्यमंत्री ठाकरे
Uddhav Thackeray

मुंबई - मातृभाषा ही आईने दिलेला आशीर्वाद असतो. तिच्याकडून मिळालेली देणगी असते. अशा देणगी मिळालेल्या भाषेचा गौरव आपण नाही तर कोण वाढणार. मराठी द्वेष्ट्यांनी हे ध्यानात ठेवावे. तुम्ही मुंबईतून सर्व गोष्टी मिळवणार आणि मराठीचा द्वेष करणार हे बरं नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ( Uddhav Thackeray on Marathi language ) केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष वाभाडे काढले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडून चालढकल सुरू आहे, असे ठाकरे म्हणाले. राज्यातील दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, असेही त्यांनी बजावलं. मराठी भाषा दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळा आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमाला दुरदृश्यवाहिनीवरून उपस्थित होते.यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या विविध अंगावर भाष्य केले.

आजचा दिवस मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस आहे. आज दिवसभर मोबाईलवर संदेश पाहताना थोडं भीती वाटत होती. कारण, आजही मराठी गौरव दिनादिवशी "हॅपी मराठी डे" असे संदेश पहावे लागतात की काय असे वाटत होते. कारण, आता आपल्याला अशा संदेशांची सवयच झाली आहे. आज या गौरव दिनाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार झाला, खरंतर त्यांचं सत्कार करण, ही कृतज्ञतेची भावना आहे. गौरव केल्यामुळे आमचीही मान उंचावली आहे, असे मत त्यांनी मांडले.

आज उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाचा शेवट हा शिवसेनेच्या भाषेत केला. 'हे खरेच आहे. ज्या राज्यात आपण जातो, त्या राज्याच्या भाषेचा सन्मान ठेवला पाहिजे. ज्यावेळी मराठी माणसाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, अशा काळात शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातील ताकद दाखवून दिली त्यांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज दिला, असे ते म्हणाले.

दिवंगत सुधीर जोशी यांची आज आठवण येते. सुधीरभाऊंनी लोकाधिकार समितीची धुरा यशस्वीपणे वाहिली. त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसरात शिवराय संचलन सुरू केले. ते संचलन पाहताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहत. त्या परिसरातील त्या मोठमोठ्या इमारती हे संचलन पाहण्यासाठी ओसंडून जात‌. ते हेच दरवाजे खिडक्या होत्या. जिथे मराठी माणसाला प्रवेश मिळत नसे. पण शिवराय संचलन पाहण्यासाठी याच खिडक्या, दरवाज्यात अशी गर्दी व्हायची जणू त्या इमारती जिवंत होऊनच हे संचलन पहात आहेत. त्यावेळी शिवसेना प्रमुखांना संकुचितवादी म्हटलं गेलं. मग इतर राज्यातील भाषा प्रेमाबद्दल, त्यांच्या आग्रहाबद्दल का बोलत नाहीत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा ही आमची मागणी म्हणजे मराठी भाषेवर, आमच्यावर उपकार नाहीत. कुणाचे हक्क डावलून लुटणारी आपली मराठी भाषा नक्कीच नाही. नेमके मराठी माणसाला प्रत्येक वेळी संघर्ष का करावा लागतो हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला मुंबई मिळाली. म्हणजे मुंबई ही आपल्याला संघर्ष करूनच मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठी भाषेचे हे वेगळेपण आहे की ती छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. हे आमचे भाग्य आहे की ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे. शिवरायांच्या मातीत, राज्यात आपण जन्मलो. या मातीत साधुसंतही होऊन गेले. त्यांच्या कर्तुत्वाचा अंश तुमच्या आमच्यात काहीसा जरी आला असेल, तर या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.

मातृभाषा ही आईने दिलेला आशीर्वाद असतो. तिच्याकडून मिळालेली देणगी असते. अशा देणगी मिळालेल्या भाषेचा गौरव आपण नाही तर कोण वाढणार. मराठी द्वेष्ट्यांनी हे ध्यानात ठेवावे. तुम्ही मुंबईतून सर्व गोष्टी मिळवणार आणि मराठीचा द्वेष करणार हे बरं नव्हे. दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत. पण या मराठी पाट्यांच्या पाठीमागं काहीतरी आहे. ते काय आहे, हे समजून घ्यायला हवे. शिवसेनाप्रमुख म्हणत, केवळ नोकऱ्या मागणारे होऊ नका. नोकऱ्या देणारे व्हा, असा त्यामागचा अर्थ आहे. म्हणून मराठी माणसांनी दुकानदार व्हावे, व्यवसाय उतरायला हवे. दबावाचा पट्टा तयार केला तरच चक्रीवादळ निर्माण होते. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करू. हा मराठी भाषेचा गौरव दिन हा गौरव दिनासारखा साजरा व्हावा, असा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

मराठी नववर्षाच्या प्रारंभी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी भाषा भवन उभे करण्याच्या कामाला सुरुवात करू‌. मराठी भाषा भवन दिमाखात उभे राहील. आता आपण प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव हा उपक्रमही मोठ्या जोमाने सुरू केला आहे. मराठी भाषा गौरव दिन पुढच्या वर्षापासून बंद सभागृहात होऊ नये. तो भव्यदिव्यच आणि मैदानावर व्हावा देशानं हा मराठी भाषेचा सोहळा पाहिला पाहिजे, असा तो व्हायला हवा. त्याची चर्चा व्हायला हवी‌, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इंग्रजी शिकायलाच हवी. पण घरात मराठीतच बोलले पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनीही आमच्या कुटुंबामध्ये असाच आग्रह धरला होता. दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला इंग्रजीतच बोलावे लागते. मग परदेशी मंडळी इकडे येत असतील तर त्यांनाही मराठी बोलावे लागेल, मराठी बोलावे असे वाटावे असा प्रयत्न करावा लागेल. इतर भाषेचा द्वेष करू नका, पण आपल्या भाषेचा अभिमान बाळगा‌. इतर भाषा जरुर शिकाव्यात पण, मातृभाषेला विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

हेही वाचा -Chhatrapati Sambhaji Raje Agitation : संभाजी राजेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार - दिलीप वळसे-पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details