महाराष्ट्र

maharashtra

मुंबई महापालिकेचा 'ड्रीम मॉल'ला वरदहस्त का? अतुल भातखळकर यांचा सवाल

By

Published : Mar 26, 2021, 4:11 PM IST

या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉलवर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज रुग्णालयावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का? असा प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला.

मुंबई- भांडुपच्या 'ड्रीम मॉल'मधील सनराईज कोरोना केंद्राला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोरोना केंद्र उभे राहते, याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉलवर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज रुग्णालयावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे का? असा प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला.

या मॉल व रुग्णालयाच्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व रुग्णालय बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे. डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांचे अग्नी तपासणी (फायर ऑडिट) करून घेण्यासाठीची वारंवार मागणी अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे केली होती.

त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये 1390 रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरू असल्याची व तेथे कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते. इतकेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्व्हेनुसार 29 मॉलमध्ये अग्नी सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते. आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता. या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात यावी व ही रक्कम मॉल व रुग्णालयाकडून वसूल करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details