महाराष्ट्र

maharashtra

केंद्र सरकार विरोधात शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन

By

Published : Apr 9, 2021, 7:33 PM IST

केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कमी लस पुरवठा करत असल्याचा आरोप कोल्हापुरातील शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने ऐतिहासिक दसरा चौक येथे लस पुरवठा करण्यात यावी यासाठी आंदोलन केले.

Shiv Sena's agitation in Kolhapur against the Central Government
केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्राला कमी लस पुरवठा करत असल्याचे म्हणत कोल्हापूरात सेनेचे आंदोलन

कोल्हापूर -राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे राज्यातील लसीकरण मोहीमेला ब्रेक लागला आहे. केंद्र सरकार जाणून-बुजून महाराष्ट्राला कमी लस पुरवठा करत असल्याचा आरोप करत आज (शुक्रवारी) शिवसेनेने ऐतिहासिक दसरा चौक येथे आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये लसीवरून युद्ध

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. अनेकांचा दररोज मृत्यूही होत आहेत. यामुळे सध्या महाराष्ट्राला लसीची अत्यंत गरज आहे. राज्यभरात केवळ एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उरला असून उद्या (शनिवार) पासून लसीकरण मोहिम पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे. असे असताना केंद्राने महाराष्ट्राला लस पुरवावी अशी महाराष्ट्र सरकार कडून मागणी करण्यात आली असून केंद्राने दुजाभाव करू नये असे म्हटले आहे. महाराष्ट्रा पेक्षाही कमी रुग्ण संख्या आणि सक्रिय रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लस पुरवली जात आहे. म्हणूनच राज्य सरकारकडून केंद्राकडे लसीची मागणी केली जाते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लसीचा साठा संपला असल्याबाबत सरकारने केलेल्या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. देशभरात केवळ तीन राज्यांना एक कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान असून राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे असेही त्यांनी ट्विट मधून म्हटले आहे. लस लोकसंख्येच्या आधारावर नाही तर त्या त्या राज्यातील लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर पुरवली जात आहे, असा टोला त्यांनी आपल्या ट्विट म्हणून लगावला होता. त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लस पुरवठ्यावरून चांगलाच वाद रंगला आहे.

वाद सोडून लसीकरणाची सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक

दरम्यान, दोन्ही पक्षातील सुरु झालेला हा वाद पाहून नेटकरी मात्र चांगलेच संतापले आहेत. आपल्यातील वाद बंद करून कशा पद्धतीने महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित ठेवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बंद पडत असलेली लसीकरण केंद्र आता पुन्हा सुरू करून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमांमधून उमटू लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details