महाराष्ट्र

maharashtra

हिंमत असेल तर राज्य सरकारमधून बाहेर पडा; FRP वरून सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

By

Published : Sep 17, 2021, 4:54 PM IST

Updated : Sep 17, 2021, 7:10 PM IST

एफआरपीचे तीन तुकडे केंद्र सरकार करणार अशा फक्त अफवा आहेत. काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी आव आणत आहेत. हा जाब त्यांनी आघाडी सरकारला विचारावा, असा टोला सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

Sadabhau Khot
सदाभाऊ खोत

कोल्हापूर -तीन टप्प्यात एफआरपीची मागणी साखर संघाची आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ठेवला आहे. निती आयोगाने त्यात फक्त पर्याय सुचवला आहे. या एफआरपीचे तीन तुकडे केंद्र सरकार करणार अशा फक्त अफवा आहेत. काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी आव आणत आहेत. हा जाब त्यांनी आघाडी सरकारला विचारावा. तसेच हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावं, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत
  • राज्य सरकारच एफआरपीचे तुकडे करेल -

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, एफआरपी संदर्भात लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी देशाच्या सहकार मंत्र्यांना भेटणार आहोत. एफआरपीचे तुकडे केंद्र सरकार करणार नाही. जर एफआरपीचे तुकडे केले तर राज्य सरकारच करेल. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी केंद्र सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. हे आम्ही भाजपचे मित्र पक्ष आहोत म्हणून ठामपणे सांगतो, असा स्पष्ट खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

  • मुश्रीफ यांनी काही केलेच नाही तर डर कशाला -

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जर मुश्रीफ यांनी काही केलेच नाही तर डर कशाला. माझ्यावर देखील माझ्या सहकाऱ्यांनी आरोप केले होते. मात्र मी त्या आरोपांना आव्हान दिलं होतं. आरोप झालेल्या नेत्यांनी घाबरू नये. त्याला आव्हान द्यावं असं सदाभाऊ खोत म्हणाले.

महिन्याला ग्रामपंचायतमधून दीड लाख रुपये कर स्वरूपात जातात. मात्र, संगणक परिचारक यांना सहा हजार रुपये मानधन दिले जाते. मग हाही एक मोठा घोटाळा आहे असं आम्ही म्हणू का? असा आरोप वजा टोला सदाभाऊ खोत यांनी मंत्री मुश्रीफ यांना लगावला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. ते मोठे आहेत. त्यामुळे अब्रुनुकसानीच्या दाव्याची रक्कम नेहमी मोठी असते. दुसऱ्याची मिरवणूक काढण्यापेक्षा या नेत्यांनी निर्दोष झाल्यावर स्वतःची हत्तीवरून मिरवणूक काढून घेतो असे जाहीर करावे, असा टोला देखील मुश्रीफ यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला.

हेही वाचा -Anil Deshmukh Case : ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नावच नाही

  • इंधन दरवाढीवरून राज्य सरकारला टोला -

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसाठी भाड्याचा सायकल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी आता का घाबरावं? जर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणत असेल तर राज्य सरकार का विरोध करत आहे? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी लगावला.

  • शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर तुम्ही चणे फुटाणे खायला तिथे थांबलात का? -

महापुरातील नुकसान भरपाईवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि राजू शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. पूरग्रस्तांना राज्य सरकारने वार्‍यावर सोडले आहे. शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ झाले पाहिजे, ही मागणी पुढे आली आहे. मात्र, सरकार या मागणीचा विचार करायला तयार नाही. सरकारमधील घटक पक्ष मगरीचे अश्रू ढाळत आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर तुम्ही चणे फुटाणे खायला तिथे थांबलात का? असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला. जर तुम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे रहाल तर आम्ही तुमचे स्वागत करू, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

हेही वाचा -गणेशविसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

Last Updated :Sep 17, 2021, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details