महाराष्ट्र

maharashtra

महापालिका घरफाळा, देवस्थान समिती घोटाळाही मार्गी लावा; आपचे सोमैयांना पत्र

By

Published : Sep 28, 2021, 4:37 PM IST

आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्राद्वारे किरीट सोमैया यांना हे आवाहन केले आहे. शिवाय भ्रष्टाचारविरोधी कामाबद्दल सोमैया यांचे अभिनंदनसुद्धा केले असून आता कोल्हापुरात आलाच आहात तर महानगरपालिका घरफाळा घोटाळा, देवस्थान समिती घोटाळासुद्धा मार्गी लावावा, अशी मागणीसुद्धा केली आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

कोल्हापूर - किरीट सोमैया यांनी निःपक्षपातीपणे भ्रष्टाचारविरोधी लढाई पुढे न्यावी, याबाबत आम आदमी पार्टीने सोमैया यांना पत्र लिहत आवाहन केले आहे. आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्राद्वारे किरीट सोमैया यांना हे आवाहन केले आहे. शिवाय भ्रष्टाचारविरोधी कामाबद्दल सोमैया यांचे अभिनंदनसुद्धा केले असून आता कोल्हापुरात आलाच आहात तर महानगरपालिका घरफाळा घोटाळा, देवस्थान समिती घोटाळासुद्धा मार्गी लावावा, अशी मागणीसुद्धा केली आहे.

संदीप देसाई

'ही लढाई अजून व्यापक करावी लागेल'

आम आदमी पार्टीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या काही महिन्यांपासून आपण महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री, राजकारणातील प्रस्थापित व्यक्ती यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहात व त्यांची ईडी, सीबीआय या संस्थाकडे तक्रारही करीत आहात. हे कौतुकास्पद आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेल्या लढाईमध्ये सर्वसामान्य जनतादेखील आपल्या बरोबर राहील, अशी मला खात्री आहे. पण त्याकरिता ही लढाई अजून व्यापक करावी लागेल. कारण केंद्र सरकार असो, किंवा राज्य सरकार. मागच्या वेळी सत्तेत असणारे असो किंवा वर्तमानातील, त्या-त्या सरकारमधील बहुतांश सर्वच मंत्र्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करावयाचे असेल तर या सगळ्यांची अंडी-पिल्ली बाहेर काढावी लागणार आहेत, असेही यामध्ये म्हटले आहे.

'इतर घोटाळेही मार्गी लावा'

आपण कोल्हापूरमध्ये आला आहत, तर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा, सध्या गाजत असलेली टक्केवारी तसेच मोठ्या प्रमाणात चर्चा असलेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा घोटाळा हे विषयदेखील मार्गी लावावेत. महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचाराची किड वेळीच मारून टाकायची असेल तर आपल्याला सर्वच पक्षांच्या विरोधात या कामाची दिशा ठेवावी लागेल. तसे केले तरच सर्व सामान्यांना बरोबर घेवून याची व्याप्ती आपल्याला वाढवता येईल, असेही यामध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details