महाराष्ट्र

maharashtra

Bhagat Singh Koshyari : कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा का दिला? घरी गेले अन् सगळंच सांगितलं म्हणाले, 'आम्हाला तर सवयच..'

By

Published : Feb 26, 2023, 11:25 AM IST

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता सक्रिय राजकारणात परतण्यास नकार दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कोश्यारी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचेही कौतुक केले.

Bhagat Singh Koshyari
भगतसिंह कोश्यारी

डेहराडून : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सक्रिय राजकारणात परतण्याची शक्यता नाकारली आणि उत्तराखंडला स्वावलंबी बनवण्यासाठी आपण काम करत राहू असे सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोश्यारी म्हणाले की, वारंवार प्रवास करून कंटाळा आल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वेळी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे राजकीय गुरू भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या शिष्याचे कौतुक केले आहे. धामी हे चांगले काम करत असल्याचे कोश्यारी म्हणाले.

'पदावर राहणे गुन्हा ठरला असता' :उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, 'मी 24 तासांत 16 तासही काम करू शकलो नाही, तर राज्यपाल पदावर राहणे हा गुन्हा ठरेल.' आपल्या कार्यकाळाबद्दल भाष्य करताना कोश्यारी म्हणाले की, त्यांना कठीण परिस्थितींचा सामना करण्याची सवय आहे. आपल्या वादग्रस्त विधानांबद्दल बोलताना माजी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, एखाद्या मुलाला आपल्याकडून चूक झाली असे वाटले तरी तो त्याबद्दल माफी मागण्यास मागेपुढे पाहणार नाही.

महापुरुषांवर टिप्पणी केली नाही : 'मुंबईतून राजस्थानी आणि गुजरातींना हाकलले तर महाराष्ट्रात काय उरणार', असे विधान कोश्यारींनी राज्यपाल असताना केले होते. या विधानावर बोलताना ते म्हणाले की, गोष्टी हाताबाहेर गेल्यामुळे लोक दुखावले होते. हे लक्षात आल्यानंतर मी लगेच माफी मागितली. मात्र, आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात कोणतीही टिप्पणी केली नसल्याचे कोश्यारी यांनी स्पष्ट केले.

पैसा आणि सत्तेमागे धावलो नाही : ते म्हणाले की, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या दोन वर्षे आधी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्याने ते पैसे आणि सत्तेच्या मागे धावत नाहीत हेच दिसून येते. एका प्रश्नाच्या उत्तरात भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आता 'सक्रिय राजकारणात' परतण्याची शक्यता नाही. ते पुढे म्हणाले की उत्तराखंडला स्वावलंबी बनवण्यासाठी मी सेवा करत राहीन. मला ते हिमालयासारखे शुद्ध आणि गंगेसारखे पवित्र हवे आहे.

धामींचे कौतूक केले : भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुढे सांगितले की, राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नात भारतीय जनता पक्षाला माझा पाठिंबा कायम राहील. माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता, पण पक्षात न राहताही त्यांची विचारधारा पाळली. त्याचवेळी कोश्यारी यांनी भाजपकडून मिळालेल्या सन्मान आणि संधीबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे राजकीय गुरू मानले जाणारे कोश्यारी यांनी त्यांचे कौतुक केले आणि ते चांगले काम करत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनीही धामींबद्दल हेच म्हटले आहे. मला विश्वास आहे की ते पूर्ण बांधिलकीने काम करत आहेत.

हेही वाचा :Delhi Liquor Scam Case : दिल्लीत वातावरण तापले.. सीबीआयचे पथक उपमुख्यमंत्री सिसोदियांच्या दारी.. सिसोदिया जाणार सीबीआयच्या कार्यालयात

ABOUT THE AUTHOR

...view details