महाराष्ट्र

maharashtra

Haryana Violence : 'अतिरिक्त फौजफाटा तैनात करा', हरियाणातील हिंसाचारानंतर सर्वोच्च न्यायालयाची सरकारला तंबी

By

Published : Aug 2, 2023, 4:42 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने विश्व हिंदू परिषदेच्या रॅलींविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सरकारांना आवश्यक तिथे अतिरिक्त सुरक्षादल तैनात करण्यास सांगितले. 'कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे प्रश्न आहेत, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे', असे न्यायालयाने म्हटले आहे.

Haryana Violence
हरियाणा हिंसाचार

नवी दिल्ली : हरियाणात विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. दिल्ली-एनसीआरमधील विहिंप-बजरंग दलाच्या रॅलीविरोधातील अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने, कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची बाब आहे. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे म्हटले. तसेच केंद्र सरकारला यापुढे हिंसाचार आणि द्वेषयुक्त भाषण होणार नाही याची खात्री करण्यास सांगितले.

'आवश्यक तेथे अतिरिक्त सैन्य तैनात करा' : सर्वोच्च न्यायालयाने या रॅलींना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नूह हिंसाचारानंतर रॅलींमध्ये द्वेषपूर्ण भाषणे आणि हिंसाचार होऊ नये यावर भर देण्यास सांगितले. न्यायालयाने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सरकारांना आवश्यक तेथे अतिरिक्त सैन्य तैनात करण्यास सांगितले. 'कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे प्रश्न आहेत, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे', असे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करू द्या, जेणेकरून हिंसाचार, द्वेषयुक्त भाषण आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अतिरिक्त पोलिस दल आणि सीसीटीव्ही कॅमेरेही तैनात करा, असे ते म्हणाले.

रॅलींमध्ये मुस्लिमांविरुद्ध घोषणाबाजी केल्याचा आरोप : रॅलींविरोधात अर्ज दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याचे वकील सी यू सिंह म्हणाले की, आज दिल्ली-हरियाणा सीमेवर रॅली काढण्याचे नियोजन आहे. दिल्लीतील संवेदनशील भागात संध्याकाळी आणखी पाच निदर्शने होत आहेत. यावर, अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे आणि या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी लागेल, असे न्यायमूर्ती एस व्ही एन भाटी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, बजरंग दल आणि विहिंपच्या युवा शाखेने हरियाणा आणि दिल्ली येथे 1 ऑगस्ट रोजी आयोजित रॅलींमध्ये विशिष्ठ धर्माविरोधात हिंसाचार पुकारत घोषणाबाजी केली.

8 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू : 31 जुलै रोजी हरियाणाच्या मेवात भागात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या यात्रेत दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यानंतर हळूहळू हिंसाचार राज्यभर पसरला. 1 ऑगस्टपर्यंत याचे लोण दिल्ली-एनसीआर आणि गुरुग्रामपर्यंत पोहचले. या हिंसाचारात आत्तापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला असून 116 जणांना अटक करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हरियाणातील हिंसाचारग्रस्त 8 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Haryana Nuh Violence : नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, 116 जणांना अटक, गुन्हेगाराला सोडणार नाही : मुख्यमंत्री खट्टर
  2. Nuh Violence : हरियाणामधील 7 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू; हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू, बुधवारी मानेसरमध्ये हिंदु संघटनांची पंचायत
  3. Stone Pelting At VHP Yatra : विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत दगडफेक, अनेक वाहने जाळली; इंटरनेट सेवा बंद

ABOUT THE AUTHOR

...view details