ETV Bharat / technology

ई-वाहनांची बॅटरी चार्जिंग करताना घ्या 'ही' काळजी, अन्यथा होऊ शकते आगीची दुर्घटना - E Vehicle Charging Precautions

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 1:06 PM IST

Updated : Apr 4, 2024, 1:11 PM IST

ई-वाहनांचा वापर करताय, बॅटरी चार्जिंग करताना घ्या 'ही' काळजी, होणार नाही कोणतंही नुकसान
ई-वाहनांचा वापर करताय, बॅटरी चार्जिंग करताना घ्या 'ही' काळजी, होणार नाही कोणतंही नुकसान

Electric Charging Precautions : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात ई-वाहनं उपल्ब्ध आहेत. तसंच दिवसेंदिवस नागरिकांचा कलही मोठ्या प्रमाणात या वाहनांकडे वळलाय. मात्र ही वाहनं हाताळताना काळजी घेण गरजेचं आहे.

मुंबई Electric Vehicle Charging Precautions : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात बुधवारी पहाटे एका इमारतीला आग लागल्यानं यात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. इमारतीबाहेर उभी असलेली ई-वाहन चार्जिंगला लावलेलं होते. याचं चार्जर दुकानाच्या आत होतं. याच चार्जरचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळं ई-वाहनं आणि आगीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

वाहन हाताळण्याच्या प्रशिक्षणाची गरज : दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे भाव यामुळं नागरिकांचा कल आजघडीला ई-वाहनांकडे जास्त वळलाय. दिवसेंदिवस ई-वाहनांच्या विक्रीत वाढ होत असली त्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झालेली नसल्याचं दिसून येतंय. सरकार ई-वाहनांनी प्रोत्साहन देत असलं तरी ती वाहनं हाताळावी कशी, याबाबातचं प्रशिक्षण वाहनचालकांना मिळत नाही. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यानं अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करुन त्या वाहनाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या प्रमाणावर अशा घटना समोर आल्यानंतर 2022 मध्ये राज्यभरात असे बेकायदा बदल करणारे उत्पादक आणि वितरकांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी अनेक बेकायदेशीर बदल केलेली ई-वाहनं जप्त करण्यात आली होती.

लिथियम आयन अत्यंत ज्वलनशील- इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी बाबत बोलताना योगटेक कंपनीचे संचालक चिन्मय गोरे म्हणाले की, "इलेक्ट्रिक बॅटरी चार्ज करताना खूप काळजी घ्यावी लागते. बॅटरी चार्ज करताना ती योग्य मानांकन असलेली सरकार मान्यता प्राप्त आहे का याची सर्वात आधी खात्री करून घ्यावी. एएसआय 156 अंतर्गत ती बॅटरी मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. कोणत्याही बॅटरीच्या चार्जिंग करिता दुसऱ्या बॅटरीचा चार्जर वापरू नये. ज्या कंपनीची बॅटरी आहे त्याच कंपनीचा चार्जर असणे सर्वात महत्त्वाचे आहे. बॅटरीसाठी वापरण्यात आलेला लिथियम आयन हा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलनशील असा धातू आहे. हा धातू अत्यंत उष्णता ग्राह्य असल्यामुळे तो उघड्यावर राहत नाही. तो योग्यरीत्या सांभाळला गेला पाहिजे, अन्यथा अपघाताच्या घटना घडू शकतात" असे गोरे म्हणाले.

कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नये- "बॅटरी चार्ज करताना ती एका विशिष्ट वेळेच्या मर्यादितच करावी. वास्तविक बॅटरी चार्ज झाल्यानंतर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम असते. जी अधिक चार्ज होऊ देत नाही. मात्र तरीही काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. बॅटरी चार्ज करताना सदर बॅटरीच्या आजूबाजूला कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नये, अथवा चार्जिंग करू नये. ज्याने अधिक भार येऊन अपघाताची घटना घडू शकते, असेही गोरे यांनी सांगितले. वास्तविक चुकीच्या हाताळणीमुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडतात. योग्य काळजी घेऊन बॅटरी चार्ज घेऊन वापरली पाहिजे," असे त्यांनी सांगितले.

ई-वाहन चार्ज करताना कोणती काळजी घ्याल :

  • वाहन चार्ज करताना उत्पादकानं दिलेल्या वायर आणि अ‍ॅडॉप्टरचा वापर करावा.
  • दुचाकी रात्रभर चार्ज करु नका. ओव्हरचार्ज झाल्यानं बॅटरी, चार्जरचा स्फोट होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसंच बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
  • पॉवर एक्सटेंशनचा वापर टाळावा. थेट स्वीचवरुन दुचाकी चार्ज करावी.
  • शक्य असल्यास धुराची माहिती देणारं यंत्र बसवावं.
  • जुन्या लिथियम-आयर्न बॅटरी घरात ठेवण्याचं टाळावं.
  • सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चार्ज करताना मान्यताप्राप्त चार्जिंग स्टेशनचा वापर करावा.
  • ई-वाहनाची बॅटरी 40 टक्क्यांपेक्षा कमी व 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करु नये.
  • बॅटरी डिस्चार्ज होण्याची वाट पाहू नका.
  • कमी वेगानं चार्ज होणाऱ्या चार्जरनं बॅटरी चार्ज करावी.
  • अति वेगानं चार्ज होणाऱ्या चार्जरचा शक्यतो वापर करु नये.
  • बॅटरी चार्ज झाल्यावर चार्जर प्लगमधून काढून ठेवावं.
  • जेवढे किलोग्रॅमची बॅटरी आहे, तेवढे युनिट चार्जिंगला लागतात.
  • आता काही ई-कार बाजारात आल्या आहेत. यात 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग झाले तर त्यात अलार्म वाजतो. तसंच 90 टक्के चार्ज झाल्यावर चार्जिंग बंद होते.

हेही वाचा :

  1. E Vehicle Fast Charging Station : वाया जाणाऱ्या अन्नापासून वीजनिर्मिती, त्यातूनच वाहनांची फास्ट चार्जिंग
  2. जुन्या वाहनाचं काय करायचं याची काळजी सोडा; ई वाहनामध्ये करता येणार रुपांतर, संभाजीनगरच्या तरुणानं शोधलं अनोखं तंत्रज्ञान
Last Updated :Apr 4, 2024, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.